वयाची १८ वर्षे पूर्ण करणारा मुंबईचा उदयोन्मुख खेळाडू यशस्वी जैस्वालने (नाबाद ८९ धावा आणि ४ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने (१९ वर्षांखालील) दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात आठ गडी आणि २०२ चेंडू राखून नेस्तनाबूत केले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

प्रथम फलंदाजी करताना डावखुरा फिरकीपटू यशस्वीच्या गोलंदाजीपुढे आफ्रिकेचा डाव २९.५ षटकांत ११९ धावांत संपुष्टात आला. जोनाथन बर्ड (२५) आणि अँड्रयू ल्यू (२४) यांनी आ्फ्रिकेकडून कडवा प्रतिकार केला. रवी बिश्नोई आणि अथर्व अंकोलेकर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून यशस्वीला उत्तम साथ दिली.

प्रत्युत्तरात यशस्वीने ५६ चेंडूंत १४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ८९ धावांची तुफानी खेळी साकारली. कर्णधार प्रियम गर्ग (०) आणि शाश्वत रावत (२) अपयशी ठरले. मात्र यशस्वीने ध्रुव जुरेलसह (नाबाद २६) ९४ धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताचा विजय साकारला.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका : २९.५ षटकांत सर्व बाद ११९ (जोनाथन बर्ड २५, अँड्रयू ल्यू २४; यशस्वी जैस्वाल ४/१३) पराभूत वि. भारत : १६.२ षटकांत २ बाद १२० (यशस्वी जैस्वाल नाबाद ८९, ध्रुव जुरेल नाबाद २६; मोंडी खुमालो १/३३)