भारत-इंग्लंड क्रिकेट मालिका

अहमदाबाद येथे मंगळवारी होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात विजय मिळवून मालिकेत २-१ अशी आघाडी घेणे भारतासाठी फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनुभवी सलामीवीर रोहित शर्माचे संघातील पुनरागमन निश्चित मानले जात असून त्याच्या समावेशासाठी के. एल. राहुलला वगळण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताला आठ गडी राखून सहज धूळ चारली. परंतु रविवारी झालेल्या दुसऱ्या लढतीत भारताने पलटवार करताना सात गडी शिल्लक ठेवून सामना जिंकण्यासह मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. युवा सलामीवीर इशान किशन आणि कर्णधार विराट कोहली भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

मात्र इंग्लंडचा संघदेखील पुनरागमन करण्यात पटाईत असल्याने भारताला तिसऱ्या सामन्यात सर्वोत्तम ११ खेळाडू खेळवणे गरजेचे आहे. त्यातच कोहलीने पहिल्या सामन्यातील नाणेफेकीच्या वेळी रोहितला दोन लढतींसाठी विश्रांती देण्यात आली आहे, असे सांगितले होते. त्यामुळे रोहितच्या पुनरागमनाविषयी चाहते उत्सुक असून त्याला संधी दिल्यास सध्या राहुललाच वगळण्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. राहुलने पहिल्या दोन सामन्यांत अनुक्रमे १ आणि ० अशा धावा केल्या आहेत. रोहित मात्र फेब्रुवारी २०२० नंतर प्रथमच भारतासाठी ट्वेन्टी-२० सामना खेळताना दिसेल.

२६ रोहित शर्माला सर्व प्रकारच्या ट्वेन्टी-२० सामन्यांत ९,००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी फक्त २६ धावांची आवश्यकता आहे.

१७ भारत-इंग्लंड यांच्यातील हा १७वा ट्वेन्टी-२० सामना असून दोघांनीही प्रत्येकी आठ सामने जिंकले आहेत.

प्रेक्षकांना प्रवेशबंदी

करोनाची वाढती संख्या लक्षात घेता भारत आणि इंग्लंड यांच्यातील उर्वरित ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी आता प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने आता चाहत्यांना तिकिटाचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले आहे.

पाच गोलंदाजांचीच रणनीती कायम

हार्दिक पंड्या पूर्ण चार षटके गोलंदाजी करण्याइतपत तंदुरुस्त असल्याने तिसऱ्या सामन्यातसुद्धा भारत सहा प्रमुख फलंदाजांसह उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या लढतीत पदार्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला आणखी एक संधी मिळू शकते. परंतु पाच गोलंदाजांपैकी एकालाही सामन्यादरम्यान दुखापत झाली अथवा त्याच्या गोलंदाजीवर धावांची लयलूट करण्यात आल्यास भारताकडे गोलंदाजीचा सहावा पर्याय उपलब्ध नसेल. भुवनेश्वर कुमार आणि शार्दूल ठाकूर यांनी आतापर्यंत वेगवान गोलंदाजांची भूमिका समर्थपणे बजावली आहे. फिरकीपटू यजुर्वेंद्र चहल अपयशी ठरला असला तरी तोच सध्या भारताचा अनुभवी फिरकीपटू असल्याने अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने खेळताना दिसेल.

इंग्लंडच्या संघात वूड, अलीचा समावेश

इंग्लंडच्या संघात तिसऱ्या सामन्यासाठी फिरकीपटू मोईन अली आणि वेगवान गोलंदाज मार्क वूड यांचा समावेश करण्यात येण्याची शक्यता आहे. वूडला पायाच्या दुखापतीमुळे दुसऱ्या लढतीतून विश्रांती देण्यात आली होती. तिसरी लढत लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवली जाणार असल्याने अलीला संधी मिळू शकते. त्यामुळे टॉम करन आणि ख्रिस जॉर्डन यांना संघातील स्थान गमवावे लागू शकते.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल तेवतिया, यजुर्वेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी, थंगरासू नटराजन.

इंग्लंड : ईऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, लिआम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम बिलिंग्स, आदिल रशीद, रीस टॉप्ली, ख्रिस जॉर्डन, सॅम करन, टॉम करन, मार्क वूड, जोफ्रा आर्चर.* वेळ : सायंकाळी ७ वा.

*  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)