भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामन्याला अखेर दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाने संमती दिलेली आहे. नवी दिल्लीत दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्ड अधिकाऱ्यांमध्ये आज एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, १४ ते १८ जुनदरम्यान बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात हा सामना रंगणार आहे. बीसीसीआयचे कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी यांनी पत्रकारांना माहिती दिली.

भारत आणि अफगाणिस्तान या दोन देशांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मैत्रीपूर्ण वातावरण आहे. आयसीसीने अफगाणिस्तानला कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा दर्जा दिल्यानंतर, बीसीसीआयने अनेक गोष्टींमध्ये अफगाणिस्तानला मदत केली आहे. देशातल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ आपल्या घरच्या मैदानावरचे सामने हे ग्रेटर नोएडातल्या शहिद विजय सिंह प्रतिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर खेळत होता.

याव्यतिरीक्त राशिद खान आणि मोहम्मद नबी या दोन अफगाण खेळाडूंना आयपीएलमध्ये चांगल्या रकमेच्या बोलीवर विकत घेतलं गेलं. याचसोबत आगामी आयपीएलच्या हंगामासाठी २७ आणि २८ जानेवारीरोजी होणाऱ्या लिलावात १३ अफगाण खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. सुरुवातीला हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेरीस दोन्ही देशांमधल्या या सामन्याच्या यजमानपदाचे हक्क बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानाला देण्यात आले आहेत.