भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. याच मैदानात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३० वर्षांपूर्वी सामना झाला होता. १९८७ च्या विश्वचषकात कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईच्या मैदानात उतरला होता. या सामन्यात भारताला एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला होता.
ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डन यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर डेव्हिड बून (४९) आणि जॉफ मार्श (११०) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २७० धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना ४९.५ षटकात भारताचा डाव २६९ धावात गुंडाळला होता.

भारताकडून श्रीकांत (७०) आणि नवज्योत सिंग सिध्दू (७३) यांचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला मैदानात तग धरता आला नव्हता. त्यामुळे एम. चिदंबरम स्टेडियमवर ३० वर्षानंतर रंगणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकरने ९ शतकांसह सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार रिकी पॉन्टिंगने सर्वाधिक ६ शतके झळकावली आहेत. तर ब्रेट ली सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला होता. त्याच्या नावावर ५५ बळी आहेत. तर भारताकडून कपिल देव यांनी सर्वाधिक ४५ विकेट्स घेतल्या आहेत.

भारतीय संघाने वेस्ट इंडिज आणि श्रीलंका दौऱ्यावर लक्षवेधी कामगिरी केली आहे. श्रीलंकेला चारीमुंड्या चीत करुन मायदेशी परतलेल्या भारतीय संघाचा उत्साह दुणावला आहे. यापूर्वी कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाला २-१ असे पराभूत केले होते. त्यामुळे आगामी सामन्यात भारतीय संघ कसोटी मालिकेप्रमाणे कामगिरी करण्यात यशस्वी ठरेल का? हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. सराव सामन्यात अध्यक्षयीन संघाला १०३ धावांनी पराभूत करत ऑस्ट्रेलियाने देखील भारतीय मैदानावर खेळण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. चेन्नईच्या मैदानात  ३० वर्षांपूर्वीच्या पराभवाचा बदला घेऊन भारतीय संघ चेन्नईच्या प्रेक्षकांची मनं जिंकणार का? हे रविवारी समजेल.