तिरंगी स्पर्धेतील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर यजमान ऑस्ट्रेलिया जेव्हा शुक्रवारी इंग्लंडशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरेल, तेव्हा त्यांच्यापुढे लक्ष्य असेल ते अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्याचेच.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात इंग्लंडवर आणि दुसऱ्या सामन्यात भारतावर विजय मिळवला होता. या सामन्यात आयसीसीच्या कारवाईमुळे कर्णधार जॉर्ज बेलीला खेळता येणार नाही, त्यामुळे स्टीव्हन स्मिथकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि स्मिथ हे दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. स्नायूंच्या दुखापतीमुळे अष्टपैलू शेन वॉटसन या सामन्यातून बाहेर पडला असून, ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का असेल. भारताविरुद्धच्या सामन्यात अ‍ॅरॉन फिंचनेही दमदार फलंदाजी केली होती. जेम्स फॉल्कनरसारखा अष्टपैलू खेळाडू संघात असून तो तळाच्या फलंदाजीचा मुख्य भाग आहे. गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क चांगल्या फॉर्मात आहे. दोन्ही सामन्यांमध्ये त्याने भेदक मारा करत फलंदाजांना धारातीर्थी पाडले आहे.
पहिल्या सामन्यात इंग्लंडला चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण भारताविरुद्धच्या सामन्यामध्ये स्टीव्हन फिन आणि जेम्स अँडरसन यांनी भेदक मारा करत संघाला सहज विजय मिळवून दिला होता. या दोघांच्या अचूक माऱ्यापुढे इंग्लंडने भारताचा डाव १५३ धावांमध्ये संपुष्टात आणला होता. फलंदाजीमध्ये कर्णधार इऑन मॉर्गनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते. गेल्या सामन्यामध्ये इयान बेल आणि जेम्स टेलर यांनी दमदार अर्धशतके लगावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

प्रतिस्पर्धी संघ :
ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), पॅट कमिन्स, झेव्हियर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, अ‍ॅरोन फिंच, ब्रॅड हॅडिन, जोश हॅझेलवूड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, मॉइझेझ हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, गुरिंदर संधू, शॉन मार्श आणि कॅमेरून व्हाइट.
इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टीव्हन फिन, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल आणि ख्रिस वोक्स.
सामन्याची वेळ : स. ८.३० वा.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार क्रिकेट १ आणि ३ वाहिनीवर.

शेन वॉटसन दुखापतग्रस्त
होबार्ट : मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन तिरंगी मालिकेतील शुक्रवारी होणाऱ्या  इंग्लंडविरुद्धच्या लढतीत खेळू शकणार नाही. वॉटसनऐवजी मॉइझेस हेन्रिक्सची निवड करण्यात आली आहे.