News Flash

ऑकलंडला पुन्हा धावांची पर्वणी!

भारत-न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा ट्वेन्टी-२० सामना

श्रेयस अय्यर, कर्णधार विराट केाहली आणि नवदीप सैनी सरावातील खेळांचा आनंद लुटताना.

भारत-न्यूझीलंड ट्वेन्टी-२० मालिका

‘फलंदाजांचे नंदनवन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईडन पार्कवर रविवारी होणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही क्रिकेटरसिकांना धावांचा वर्षांव अनुभवता येईल. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवून देणारा संघच भारत कायम ठेवला जाण्याची दाट शक्यता असली तरी गोलंदाजीतील बदल मात्र अपेक्षित आहे.

विशेष आकाराच्या आणि सीमारेषा जवळ असलेल्या या मैदानावर उभय संघांतील फक्त जसप्रीत बुमरा या एकमेव गोलंदाजाने आठपेक्षा कमी धावा दिल्या. मोहम्मद शमी (४ षटकांत ०/५३) आणि शार्दूल ठाकूर (३ षटकांत १/४४) या गोलंदाजांवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जोरदार हल्ला चढवला. अनुभवी शमी ११ जणांमधील स्थान टिकवू शकेल, परंतु ठाकूरऐवजी नवदीप सैनीची निवड होऊ शकेल.

भारत आणखी एक फिरकी गोलंदाज खेळवण्याची शक्यता

दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारत तीन वेगवान आणि दोन फिरकी अशा पाच विशेषज्ञ गोलंदाजांच्या समन्वयावर कायम राहील का, हे उत्सुकतेचे ठरणार आहे. रवींद्र जडेजा आणि यजुर्वेद्र चहल यांच्या साथीला कुलदीप यादव किंवा वॉशिंग्टन सुंदर यापैकी एक फिरकी गोलंदाजाचा पर्याय भारत हाताळू शकेल. जर भारताने ही रणनीती आखल्यास अष्टपैलू शिवम दुबेचा तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून योग्य वापर होऊ शकेल. पहिल्या सामन्यात जडेजा-चहल जोडीने आपली भूमिका चोख बजावली. या दोघांनी एकूण ३६ चेंडूंत ५० धावा दिल्या आणि प्रत्येकी एकेक बळी घेतले. चहल-कुलदीप जोडी गतवर्षीच्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषकानंतर एकत्रितपणे खेळलेली नाही.

श्रेयसचा चौथा क्रमांक पक्का

भारताची फलंदाजीची फळी अधिक स्थिर जाणवते आहे. भारताने न्यूझीलंडचे २०४ धावांचे अवघड लक्ष्य सहज पार करीत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन या बाबतीत तरी प्रयोग करणार नाही. कर्णधार विराट कोहली जबाबदारीने फलंदाजी करीत आहे. श्रेयस अय्यरने शुक्रवारी चौथ्या क्रमांकाला न्याय देणारी २९ चेंडूंत ५८ धावांची महत्त्वाची खेळी साकारली. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून श्रेयस भारताच्या आतपर्यंतच्या सर्व १२ ट्वेन्टी-२० सामन्यांत खेळला आहे. यातील ११ डावांत त्याने दोन अर्धशतकांसह ३४.१४ धावसरासरी राखली आहे. ईडन पार्कच्या खेळीने त्याने आपला क्रमांक पक्का केला आहे. लोकेश राहुल एकीकडे फलंदाजी आणि यष्टिरक्षण या दोन्ही जबाबदाऱ्या हिमतीने सांभाळतो आहे, तर मनीष पांडे आणि दुबे हाणामारीच्या षटकांमध्ये अजमावले जात आहेत.

न्यूझीलंडची भिस्त विल्यम्सनवर

भारताच्या गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये फलंदाजांवर अंकुश ठेवल्याने न्यूझीलंडला १०-१५ धावा कमी करता आल्या. याचप्रमाणे क्षेत्ररक्षणातील चुकांमुळे भारतीय फलंदाजांना आत्मविश्वासाने धावा करता आल्या. मात्र या चुकांतून धडे घेत भारताला २-० अशी आघाडी घेण्यापासून रोखण्याचे आव्हान न्यूझीलंडपुढे असेल. २०१९मध्ये न्यूझीलंडने भारताविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका १-२ अशा फरकाने गमावली होती. मार्टिन गप्टिल आणि कॉलिन मुन्रो या सलामीवीरांनी धावांचा पाया रचल्यानंतर अनुभवी फलंदाज केन विल्यम्सन आणि रॉस टेलर यांनी टीकाकारांना चोख उत्तरे देणारी आक्रमक अर्धशतके झळकावली. विल्यम्सनने ट्वेन्टी-२० प्रकारात डावाला सुरुवात करावी, अशा शक्यताही चर्चेत आहेत. कॉलिन डी ग्रँडहोम आणि टिक सेफर्ट यांनीसुद्धा कामगिरी उंचावण्याची आवश्यकता आहे.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, लोकेश राहुल (यष्टिरक्षक), ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर, नवदीप सैनी.

न्यूझीलंड : केन विल्यम्सन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, रॉस टेलर, स्कॉट कुगेलेइन, कॉलिन मुन्रो, कॉलिन डी ग्रँडहोम, टॉम ब्रूस, डॅरेल मिचेल, मिशेल सँटनर, टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), हॅमिश बेनेट, ईश सोधी, टिम साऊदी, ब्लेअर टिकनर.

* वेळ : दुपारी १२.३० वाजल्यापासून

*थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 1:44 am

Web Title: india and new zealand face another twenty20 match today abn 97
Next Stories
1 उपनगर-परभणी मुलींमध्ये तर ठाणे-पुणे मुलांमध्ये अंतिम सामना
2 आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या अभावामुळे सायकलिंगमध्ये भारत पिछाडीवर!
3 वूडच्या गोलंदाजीपुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची हाराकिरी
Just Now!
X