Asian Games 2018 : १८व्या आशियाई स्पर्धांचा भव्य-दिव्य असा उद्घाटन सोहळा शनिवारी जकार्ता येथे पार पडला. गिलोरा बंग कार्नो स्टेडियमवर हा कार्यक्रम झाला. इंडोनेशियाच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या उत्कृष्ट अशा सोहळ्याने साऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. फटाक्यांची धामधूम आणि दिवे व लाईटची आकर्षक सजावट यामुळे सारेच प्रसन्न झाले.

यावेळी इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांनी बाईकवरून केलेला प्रवेश हा साऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरला. इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो हे आपल्या कार्यालयातून मुख्य स्टेडियमवर मोटारसायकलवरून आले. येताना त्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिकेही केली. त्याचे चित्रीकरणही उद्घाटन समारंभात दाखविण्यात आले.

१८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान या स्पर्था होणार आहेत.भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भारताचे प्रतिनिधित्व केले. तो या उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजवाहक होता. ८०४ खेळाडूंच्या भारतीय संघाने या परेड मध्ये सहभाग घेतला.

 

असा रंगला सोहळा –

दक्षिण व उत्तर कोरियाचे एकत्रित संचलन, मोटारसायकलवरून येताना अध्यक्ष जोको विदोदो यांनी केलेली साहसी स्टंटबाजी, चार हजारहून अधिक कलाकारांनी सादर केलेल्या पारंपरिक रचना व अनेक नामवंत संगीतकारांचा सहभाग, यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन समारंभ वैशिष्टय़पूर्ण ठरला.

गेलोरा बुंग कनरे स्टेडियमवर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभाचा प्रारंभ इंडोनेशियाच्या पारंपरिक नृत्यांच्या सादरीकरणाद्वारे झाला. त्यामध्ये पंधराशेहून अधिक मुलामुलींनी भाग घेतला होता. या समारंभात जॉय अ‍ॅलेक्झांडर, रईसा यांच्यासह अनेक गायकांनी आपल्या सुमधुर गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेले गीत गाण्याचा मान व्हिआ वॉलनला मिळाला. देशात असलेल्या विविध फुलांची माहिती प्रेक्षकांना व थेट प्रक्षेपण पाहणाऱ्यांना मिळावी यासाठी खास कार्यक्रम या उद्घाटन सोहळय़ात ठेवण्यात आला होता. यापूर्वी १९६२ मध्ये इंडोनेशियाने आशियाई स्पर्धेचे संयोजन करण्यात आले होते. त्यावर आधारित तयार करण्यात आलेली चित्रफीत येथे सादर करण्यात आली. बार्सिलोना येथे १९९२ झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनचे सुवर्णपदक मिळविणारी खेळाडू सुसी सुसांती हिला येथे क्रीडाज्योत प्रज्वलित करण्याचा मान मिळाला.

आशियाई ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष शेख अल फहाद अल सबाह यांनी सर्वाचे स्वागत करीत जोको यांना स्पर्धेचे उद्घाटन करण्याची विनंती केली. जोको यांनी या स्पर्धेचे उद्घाटन झाल्याचे मी जाहीर करतो, असे केवळ एका ओळीचे निवेदन करीत उद्घाटन केले.