भारत-पाकिस्तान मालिका श्रीलंकेत खेळविण्यावर उभय देशांच्या क्रिकेट मंडळांचे शिक्कामोर्तब झाले असून त्यास केंद्र सरकारची परवानगी मिळणे बाकी असल्याची माहिती आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी गुरूवारी दिली. भारत-पाकिस्तान मालिका श्रीलंकेत घेण्यास पाकिस्तान क्रिकेट बोर्ड(पीसीबी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) तयारी दर्शविली असून पाकिस्तान सरकारनेही त्यास हिरवा कंदील दिला आहे. आता केवळ भारत सरकारची परवानगी मिळणे शिल्लक आहे. ती केंद्र सरकार देईल अशी आशा असल्याचे शुक्ला यावेळी म्हणाले.

भारत-पाकिस्तान मालिकेची चर्चा गेले काही दिवस ऐरणीवर होती. बीसीसीआयने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट केले होते, तर पीसीबीने भारतात खेळण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. त्यामुळे त्रयस्थ ठिकाणी म्हणजेच श्रीलंकेत मालिका खेळण्याचा प्रस्ताव चर्चेत आला. त्यावर उभय देशांच्या क्रिकेट मंडळांनी सहमती दर्शवली. येत्या १५ डिसेंबरपासून श्रीलंकेत सुरू होणाऱया या मालिकेत तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश आहे.