पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने भारतीय क्रिकेटपटूंसोबत आपले मैत्रिपूर्ण संबंध असल्याचे सांगताना गौतम गंभीर याला अपवाद असल्याचे म्हटले. पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ असल्याने दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानात बाचाबाची होणं सहाजिक आहे. पण मैदानात घडलेला प्रसंग हा तेवढ्यापुरताच मर्यादित असतो. मैदानाबाहेर भारत आणि पाकिस्तान संघाच्या खेळाडूंमध्ये चांगले संबंध राहिले आहेत. मात्र, गौतम गंभीर त्यास अपवाद आहे. गंभीर अद्यापही आपल्याला मित्र मानत नाही, असे आफ्रिदीने म्हटले.

येत्या जून महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ सहभागी झाल्यास भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेतील अनुभवांची माहिती देत असताना शाहिदने गंभीरसोबत घडलेल्या शाब्दीक चकमकीचे उदाहरण दिले.

आफ्रिदी म्हणाला की, ”भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ आहे. पण यास नक्कीच गंभीरसारख्या खेळाडूंचा अपवाद आहे. गंभीर आणि मी तुम्हाला केव्हाच कॉफी शॉप बराचवेळ एकत्र बसलेलो पाहायला मिळणार नाही. काही वर्षांपूर्वी आमच्यात भर मैदानात शाब्दीक युद्ध रंगले होते आणि जगभरात त्याची चर्चा झाली. पण कालांतराने मी झालं गेलं विसरून गेलो. कारण अशा गोष्टी खेळाचाच एक भाग असतात असं मला वाटतं, पण गंभीर अद्यापही त्यातून बाहेर आलेला नाही.”

 

शाहिद आफ्रिदीने यावेळी भारतीय संघातील खेळाडूंसोबत असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधांमध्ये हरभजन सिंग, युवराज, आणि झहीर खान यांचे नाव घेतले.

”भारतीय संघातही माझे खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यासोबतच्या आठवणी मी केव्हाच विसरू शकत नाही. करिअरच्या उमेदीच्या काळात मी भारतीय खेळाडूंसोबत मी खूप वेळ व्यतित केला. याशिवाय त्यांच्या घरी देखील गेलो होतो. पुढे सर्व विवाहित झाले आणि आमचं घरी भेटणं कमी होत गेलं.”, असेही शाहिद आफ्रिदी म्हणाला.