भारताचा दौरा अर्धवट सोडून वेस्ट इंडिज संघाने माघार घेतल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाकडून २५० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
वेस्ट इंडिजचे खेळाडू व त्यांचे मंडळ यांच्यात सध्या आर्थिक मुद्दय़ावरून मतभेद निर्माण झाले आहेत. धरमशाला येथील चौथा एकदिवसीय सामना झाल्यानंतर विंडीजच्या खेळाडूंनी उर्वरित दौरा सोडून मायदेशी प्रयाण केले. त्यांनी हा दौरा अर्धवट सोडल्यामुळे बीसीसीआयचे खूप आर्थिक नुकसान झाले. या सामन्यांसाठी करण्यात आलेली तयारी वाया गेली. भारतीय खेळाडूंना कसोटी सामन्यांचा सराव मिळावा म्हणूनही ही मालिका आयोजित करण्यात आली होती. मालिका रद्द झाल्यामुळे खेळाडूंचेही आर्थिक नुकसान झाले.
बीसीसीआयचे सचिव संजय पटेल म्हणाले, ‘‘नुकसानभरपाई संदर्भातील पत्र आम्ही वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला पाठविले आहे. या पत्राचे उत्तर पाठविण्यासाठी दोन आठवडय़ांची मुदत आम्ही दिली आहे. तसेच नुकसानभरपाई कशी करणार याचेही नियोजन आम्ही त्यांच्याकडून मागितले आहे. जर वेस्ट इंडिजकडून योग्य उत्तर आले नाही तर आम्ही त्यांच्याविरुद्ध येथील न्यायालयात कायदेशीर कारवाई करणार आहोत. याबाबत आम्ही मंडळाच्या कायदेशीर सल्लागारांना सूचनाही दिल्या आहेत.’’
वेस्ट इंडिजचे क्रिकेट मंडळ दिवाळखोरीत असताना ते भारताने मागणी केलेली नुकसानभरपाई खरोखरीच करू शकतील काय, असे विचारले असता पटेल म्हणाले, ‘‘कसे पैसे उभे करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला नुकसानभरपाई होणे महत्त्वाचे आहे. जर त्यांनी ही भरपाई दिली नाही तर आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे संपर्क साधणार आहोत. प्रत्येक मंडळाला आयसीसीकडून उत्पन्नातील काही वाटा दिला जात असतो. या रकमेतून आम्हाला त्यांनी नुकसानभरपाई द्यावी अशी आम्ही आयसीसीला मागणी करणार आहोत.’’