आशियाई क्रीडा स्पध्रेतील काही प्रकारांतून माघार घेण्याच्या भारताच्या धोरणावर आशियाई ऑलिम्पिक परिषदेने ताशेरे ओढले आहेत. याचे गंभीर परिणामांना भारताला सामोरे जावे लागेल, असा इशारा या परिषदेने भारताला दिला आहे. दरम्यान, काही सरकारी अधिकाऱ्यांमुळे क्रीडा क्षेत्राची वाताहत होत आहे, अशी टीका भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केली आहे.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला आशियाई ऑलिम्पिक परिषदेने २९ ऑगस्टला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, इन्चॉन (दक्षिण कोरिया) येथे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताने फुटबॉल, टेबल टेनिस यांसारख्या क्रीडा प्रकारांमधून माघार घेतली तर त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील.
‘‘भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतातील राष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेला १७व्या आशियाई क्रीडा स्पध्रेतील फुटबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, टेबल टेनिस आणि सेपक टकरॉ यांसारख्या काही क्रीडा प्रकारांमधून माघार घेण्यासाठी दडपण आणत आहे. या साऱ्या स्पर्धाची कार्यक्रम पत्रिका तयार आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने माघार घेण्याचा निर्णय अमलात आणला, तर ते कोलमडेल. त्यामुळे त्याच्या परिणामांना त्यांना नक्की सामोरे जावे लागेल,’’ असे आशियाई ऑलिम्पिक असोसिएशनचे संचालक विनोद कुमार तिवारी यांनी ई-मेलमध्ये म्हटले आहे.