‘आयसीसी’ क्रमवारीत फलंदाजांमध्ये कोहलीचे आणि गोलंदाजांमध्ये बुमराचे अव्वल स्थान कायम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघ दुसऱ्या स्थानावर कायम आहे. याच प्रमाणे कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांनी अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीमधील अव्वल स्थान कायम राखले आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील लागोपाठच्या एकदिवसीय मालिकांमध्ये बाजी मारणाऱ्या भारताच्या खात्यावर आता १२२ गुण जमा आहेत, तर क्रमवारीत अव्वल स्थान असणाऱ्या इंग्लंडचे १२६ गुण आहेत.

गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत महेंद्रसिंह धोनीने दिमाखदार कामगिरीचे प्रदर्शन करताना मालिकावीर पुरस्काराला गवसणी घातली होती. तीन अर्धशतके नोंदवणाऱ्या धोनीच्या क्रमांकात तीन स्थानांनी सुधारणा झाली असून, तो आता १७व्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत केदार जाधवनेही आठ स्थानांनी आगेकूच करताना ३५व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक (एका स्थानाने आगेकूच, ८व्या स्थानावर), रीझा हेंड्रिक्स (३६ स्थानांनी आगेकूच, ९४व्या स्थानावर) या फलंदाजांनी प्रगती केली आहे. याचप्रमाणे अँडीले फेहलूकवायोने आठ बळी घेताना गोलंदाजांच्या क्रमवारीत १३ स्थानांनी सुधारणा केली आहे. तो आता १९व्या स्थानावर आहे. ड्वेन प्रेटोरियसने ५३व्या स्थानावरून ४४व्या स्थानापर्यंत आगेकूच केली आहे.

भारताविरुद्धच्या मालिकेत एकूण १२ बळी घेणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने क्रमवारीत तिसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. चौथ्या एकदिवसीय सामन्यात बोल्टने २१ धावांत ५ बळी घेतल्यामुळे न्यूझीलंडने भारताची त्रेधातिरपीट उडवली होती.

भारताचा लेग-स्पिनर यजुर्वेद्र चहलने एका स्थानाने आगेकूच केली असून, तो आता पाचव्या स्थानावर आहे. याच प्रमाणे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची क्रमवारीत सहा स्थानांनी सुधारणा झाली असून तो १७व्या स्थानावर आहे.

संघांच्या क्रमवारीत न्यूझीलंडची घसरण झाली असून, हा संघ आता दक्षिण आफ्रिकेनंतर चौथ्या स्थानावर आहे. संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळ या दोन्ही संघांच्या खात्यावर प्रत्येकी १५ गुण जमा आहेत. मात्र दशांश गुणांमुळे अमिराती १४व्या आणि नेपाळ १५व्या स्थानावर आहेत.