भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका

मुंबईत पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने कात टाकली आणि राजकोटच्या दुसऱ्या लढतीत शानदार विजयानिशी मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे तिसऱ्या लढतीद्वारे मालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या इराद्याने एकदिवसीय क्रिकेटमधील दोन तुल्यबळ संघ रविवारी बेंगळूरुत खेळतील.

वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून विजय मिळवत आपल्या ताकदीचा इशाराच जणू दिला. मग दुसऱ्या लढतीत फलंदाजीचे क्रम स्थिरस्थावर करीत कर्णधार विराट कोहलीने मालिकेतील आव्हान शाबूत ठेवले. आता भारतीय भूमीवर सलग दुसऱ्या मालिका विजयासाठी ऑस्ट्रेलियाला संधी आहे.

पाचव्या क्रमांकावरील राहुलमुळे मधल्या फळीत स्थैर्य

मुंबईत रोहित शर्मा, शिखर धवन आणि के. एल. राहुल या सलामीवीरांना पहिले तीन क्रम देत स्वत: चौथ्या क्रमांकावर उतरण्याची कोहलीची रणनीती अपयशी ठरली. मग राजकोटला रोहित-धवनच्या सलामीनंतर कोहली पुन्हा त्याच्या तिसऱ्या क्रमांकावर खेळला. श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले, तर राहुलला पाचव्या क्रमांकावर खेळवण्याची चाल विलक्षण यशस्वी ठरली. त्यामुळे अखेरच्या लढतीत हेच क्रम कायम ठेवले जातील. या सामन्यात दुखापतग्रस्त ऋषभ पंतच्या जागी मनीष पांडेला सहाव्या क्रमांकावर संधी मिळाली. पंत तंदुरुस्त झाल्यास तो या क्रमांकावर परतू शकेल. परंतु राजकोटला राहुलच्या ८० धावांच्या (५२ चेंडूंत) धडाकेबाज खेळीचा भारताच्या ३४० धावसंख्येत सिंहाचा वाटा होता. पहिल्या लढतीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करीत ४७ धावा करणाऱ्या राहुलने १५०हून अधिक ‘स्ट्राइक रेट’ राखला. या निमित्ताने मधल्या फळीला स्थर्य देऊ शकणारा फलंदाज गवसल्याचा आनंद कोहली सामन्यानंतर लपवू शकला नाही. पंतच्या अनुपस्थितीत राहुलने यष्टिरक्षणाची जबाबदारीसुद्धा चोख बजावली. धोकादायक फलंदाज आरोन फिंचला यष्टिचीत केले, तर दोन सुरेख झेल पकडले. सामन्याआधी रोहितच्या साथीने सलामी कोण करणार, ही चर्चा आता मागे पडली आहे. कारण राहुलने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.

ऑस्ट्रेलियाची भिस्त स्मिथ-लबूशेनवर

राजकोटच्या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाच्या संघरचनेत कोणतेही बदल केले जाणार नाहीत. कुलदीपच्या धक्कातंत्रापर्यंत स्मिथच्या (९८ धावा) बळावर ऑस्ट्रेलियाने धावांचा पाठलाग उत्तम राखला होता. अन्यथा पाहुण्या संघाने दुसऱ्याच सामन्यात मालिका जिंकली असती. परंतु ते अपयशी ठरले. एकदिवसीय क्रिकेटमधील पहिल्याच डावात मार्नस लबूशेनने आपली छाप पाडली. परंतु चुकीच्या वेळी तो बाद झाला. गोलंदाजीत मिचेल स्टार्क महागडा (१० षटकांत ७८ धावा) ठरला. त्याचा साथीदार पॅट कमिन्सला मुंबईचा कित्ता गिरवता आला नाही. लेग-स्पिनर अ‍ॅडम झम्पाने मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाचव्यांदा कोहलीचा बळी मिळवला. अ‍ॅश्टॉन अगरसुद्धा (८ षटकांत ६३ धावा) प्रभाव दाखवू शकला नाही.

ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना कुलदीपचा धसका

तीन वेगवान आणि दोन फिरकी अशा पाच गोलंदाजांच्या रचनेत अखेरच्या लढतीसाठी कोणताही बदल केला जाणार नाही. गतवर्षी आपला प्रभाव पाडू न शकलेल्या कुलदीप यादवने राजकोटला सामन्याचा निकाल पालटताना अ‍ॅलेक्स केरी आणि स्टीव्ह स्मिथ यांना एकाच षटकात तंबूची वाट दाखवली. त्यामुळे कुलदीपच्या फिरकीचा ऑस्ट्रेलियाने धसका घेतला आहे. दुखापतीतून सावरत पुनरागमन करणाऱ्या जसप्रीत बुमराने राजकोटला दर्जाला साजेशी टिच्चून गोलंदाजी केली. सुरुवातीला महागडय़ा ठरलेल्या मोहम्मद शमीने उत्तरार्धात नवदीप सैनीच्या साथीने गोलंदाजीची लय पकडली.

संघ

* भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, के. एस. भरत (यष्टिरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी.

* ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), अ‍ॅलेक्स केरी (यष्टिरक्षक), पॅट्रिक कमिन्स, अ‍ॅश्टॉन अगर, पीटर हँड्सकोम्ब, जोश हॅझलवूड, मार्नस लबूशेन, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टॉन टर्नर, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

* सामन्याची वेळ : दुपारी १.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स हिंदी.