भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिका

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा एकदिवसीय क्रिकेट सामना आज

मोहाली येथील चौथ्या लढतीत तब्बल ३५९ धावांचे भलेमोठे लक्ष्य उभारूनही त्याचा बचाव करण्यात अपयशी ठरलेल्या भारतीय संघाला बुधवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या व अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य झाले आहे. मायदेशातील ट्वेन्टी-२० मालिका गमावणाऱ्या भारताला आता एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी आरपारची लढाई करावी लागणार आहे.

विश्वचषकापूर्वी भारताचा हा शेवटचा एकदिवसीय सामना असल्यामुळे सर्वोत्तम संघाच्या शोधात असलेल्या विराटसेनेसाठी ही अंतिम संधी असेल. त्यामुळे या आरपारच्या लढाईत कांगारूंवर वर्चस्व मिळवून ३-२ अशा फरकासह मालिका खिशात घालण्याचे आव्हान भारताला पेलावे लागणार आहे. अन्यथा मायदेशात सलग तीन सामन्यांसह मालिका पराभवाच्या नामुष्कीचा त्यांना सामना करावा लागू शकतो.

दिल्लीकरांवर भारताची मदार

चौथ्या सामन्यात १४३ धावांची झुंजार खेळी साकारत लयीत परतणारा शिखर धवन व मालिकेत आतापर्यंत दोन शतके झळकावणारा कर्णधार विराट कोहली या दिल्लीकरांवर भारताच्या फलंदाजीची प्रामुख्याने भिस्त असेल. त्याशिवाय रोहित शर्मा, विजय शंकर व केदार जाधवदेखील लयीत असल्यामुळे फलंदाजीत भारताला फारशी चिंता करण्याची गरज नाही. लोकेश राहुलला संघातील स्थान पक्के करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.

पंतवर सर्वाच्या नजरा

महेंद्रसिंह धोनीला विश्रांती देण्यात आल्यामुळे चौथ्या सामन्यात संधी मिळालेल्या ऋषभ पंतने फलंदाजीत बऱ्यापैकी योगदान दिले असले तरी यष्टिरक्षणातील त्याचा गचाळ कामगिरीचा भारताला फटका बसला. स्टेडियममधील प्रेक्षकांनी तर सामन्यादरम्यानच ‘धोनी, धोनी’चा नारादेखील लगावला होता. त्यामुळे पुन्हा एकदा पंतकडे सर्व क्रीडारसिकांचे लक्ष असेल.

टर्नर, कमिन्सपासून सावधान

४३ चेंडूंत ८४ धावांची तुफानी खेळी साकारत भारताच्या तोंडून विजयाचा घास हिरावणाऱ्या अ‍ॅश्टन टर्नरने भारताची डोकेदुखी वाढवली आहे. पीटर हँड्सकॉम्ब, उस्मान ख्वाजा धावांची रतीब रचत असताना टर्नरमुळे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अधिक बळकट झाली आहे. त्याशिवाय चार सामन्यांत १२ बळी मिळवणाऱ्या पॅट कमिन्स व फिरकीपटू अ‍ॅडम झम्पा यांच्यापासूनही भारताला सावध राहावे लागणार आहे.

कोटलाचा इतिहास भारताच्या बाजूने

दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर होणाऱ्या या सामन्यात दवाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येथे झालेल्या शेवटच्या दोन सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानेच सामन्यात बाजी मारली असून फिरकीपटूंचे येथे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. यापूर्वी ऑक्टोबर २००९ मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया कोटलावर आमने-सामने आले होते. उभय संघात येथे झालेल्या चार एकदिवसीय सामन्यांपैकी तीन भारताने जिंकले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे.

४गेल्या ४ वर्षांत भारताने मायदेशात एकही एकदिवसीय मालिका गमावलेली नाही. २०१५मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला ३-२ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता.

४६एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८,००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी रोहित शर्माला ४६ धावांची आवश्यकता आहे.

२००९ऑस्ट्रेलियाने २००९नंतर भारताविरुद्ध त्यांच्याच देशात अद्याप एकदाही एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही. त्याशिवाय ०-२ अशा पिछाडीवर असताना प्रथमच मालिका जिंकण्याची संधीदेखील त्यांना आहे.

सलग दोन सामन्यांत विजयी झाल्यामुळे संपूर्ण संघाचा आत्मविश्वास बळावला आहे. या संघासह आम्ही आगामी विश्वचषकातदेखील उत्तम कामगिरी करू शकतो, याची खेळाडूंना खात्री आहे.

– अ‍ॅलेक्स कॅरे, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज

संघ

* भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, केदार जाधव, विजय शंकर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, रवींद्र जडेजा, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत (यष्टिरक्षक.)

* ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), उस्मान ख्वाजा, पीटर हँड्सकॉम्ब, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, अ‍ॅश्टन टर्नर, झाये रिचर्ड्सन, अ‍ॅडम झम्पा, अँड्रय़ू टाय, पॅट कमिन्स, नॅथन कोल्टर-नाइल, अ‍ॅलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), नॅथन लायन, जेसन बेहरेंड्रॉफ.

* सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजतापासून

* थेट प्रेक्षपण : स्टार स्पोर्ट्स १