ख्रिस सिरीएलोच्या गोलने यजमानांचा विजय हिरावला

भारताने ०-१ अशा पिछाडीनंतरही दमदार पुनरागमन करताना तीन सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेतील पहिल्या लढतीत तगडय़ा ऑस्ट्रेलिया संघाला कडवी झुंज दिली. व्ही.आर. रघुनाथने दोन गोल करून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली, परंतु ख्रिस सिरीएलोच्या निर्णायक गोलने यजमानांना २-२ असे बरोबरीत समाधान मानण्यास भाग पाडले. या महिन्याअखेरीस सुरू होणाऱ्या जागतिक हॉकी लीग अंतिम स्पध्रेची पूर्वतयारी म्हणून ही कसोटी खेळविण्यात येत आहे.
छत्तीसगडमधील राजनांदगांव जिल्हृाात खेळविण्यात आलेल्या या सामन्यात ९व्या मिनिटाला भारताची बचावभिंत भेदून डीलॅन वॉदरस्पूनने ऑस्ट्रेलियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाच्या या आक्रमणासमोर न खचता भारताने पुनरागमन केले. २८व्या मिनिटाला कर्णधार सरदार सिंगच्या पासवर रघुनाथने गोल करून सामन्यात १-१ अशी बरोबरी मिळवली. रघुनाथच्या या गोलने प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमवर जल्लोष सुरू झाला. ४३व्या मिनिटाला रघुनाथने आणखी एक गोल करून भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. रघुनाथचा हा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १२५ वा गोल ठरला. सामना संपायला पाच मिनिटांचा खेळ शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाच्या सिरीएलोने ५८व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून सामना २-२ असा बरोबरीत आणला.