मेलबर्न : महिला विश्वचषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ सर्वात प्रभावशाली आहेत, असे ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने म्हटले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेन्टी-२० विश्वचषकाची सलामीची लढत शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) खेळवण्यात येणार आहे.

‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने महिलांचे क्रिकेट एक वेगळी उंची गाठणार आहे. त्यातच ऑस्ट्रेलिया हा यजमान देश आहे, याचा मला अभिमान आहे. विश्वचषकाची सलामीची लढत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन सर्वोत्तम संघांमध्ये सिडनी येथे होत आहे ही आणखी एक चांगली बाब आहे,’’ असेही ब्रेट ली याने म्हटले.

भारताच्या महिला संघाचेही ब्रेट ली याने कौतुक केले. तो म्हणाला, ‘‘हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि शफाली वर्मा या सर्वोत्तम फलंदाज आहेत. भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रत्येकाचे लक्ष असेल यात शंका नाही.’’