आज ‘वाका’वर भारत-ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना; वेगवान खेळपट्टीवर फलंदाजांची कसोटी ; विजयी सलामीसाठी दोन्ही संघ सज्ज
‘वाका’वर मंगळवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला संघर्षमय सामना रंगणार आहे. दोन्ही संघांमधील परंपरागत हाडवैर एकदिवसीय मालिकेत क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करल्यामुळे भारताची विश्वविजेतेपदाची वाटचाल खंडित झाली होती. त्यानंतर कांगारूंनी दिमाखात जगज्जेतेपद काबीज केले होते. ‘त्या’ पराभवाचे उट्टे फेडण्याचे आव्हान भारतापुढे असेल. याशिवाय मार्चमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद जिंकण्याचा निर्धार दोन्ही संघांनी केला आहे. त्याच दृष्टीने दोन्ही संघांची तयारी आणि रंगीत तालीम या ऑस्ट्रेलियन भूमीवर दिसून येईल.
मार्च-एप्रिलमध्ये भारतीय भूमीवर होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्धची छोटेखानी मर्यादित षटकांची मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेचा या दौऱ्यात समावेश आहे. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विजयी घोडदौड राखत विश्वविजेतेपदाकडे कूच करण्याची जबाबदारी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर असेल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पश्चिम ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धचे दोन सराव सामने (एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२०) जिंकून भारताने शुभवर्तमानाची ग्वाही दिली आहे. त्यामुळे स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑसी संघाला गाफील राहून चालणार नाही.
एकदिवसीय क्रिकेटचा विचार केल्यास २०१५ हे वर्ष भारतासाठी अनुकूल ठरले नव्हते. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लागोपाठच्या एकदिवसीय मालिका भारताने गमावल्या. कर्णधार धोनी हे अपयश मागे टाकून आत्मविश्वासाने नव्या वर्षांतील नव्या आव्हानांकडे पाहात आहे. मात्र ऑस्ट्रेलियन भूमीवर भारतासोबत एक ‘तेज’स्वी अस्त्र नसणार आहे. मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे मोहम्मद शमी दौऱ्याला प्रारंभ होण्यापूर्वीच मायदेशी परतला आहे.
धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर, वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि निवृत्त मिचेल जॉन्सन ऑस्ट्रेलियाच्या संघात नसल्यामुळे भारतीय संघावरील दडपण कमी असेल. जोश हॅझलवूड, जोएल पॅरिस, स्कॉट बोलँड आणि जेम्स फॉल्कनर ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याची धुरा सांभाळतील. या चौघांकडे अनुभवाची कमतरता आहे.
गोलंदाजीच्या माऱ्याबाबत विचार केल्यास धोनीला संघनिवड करणे अधिक कठीण जाणार आहे. भारताचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा एकही सराव सामन्यात खेळलेला नाही. त्यामुळे सलामीच्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत खात्री देता येत नाही.
ऑस्ट्रेलियामधील सर्वात उसळणारी खेळपट्टी असे बिरुद मिरवणाऱ्या ‘वाका’वर तीन वेगवान गोलंदाज खेळवण्याशिवाय भारताकडे पर्याय नाही. या परिस्थितीत इशांत आणि उमेश यादवसोबत डावखुरा वेगवान गोलंदाज बरिंदर शरणला पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. शरणने वेग आणि स्विंगच्या बळावर दोन्ही सराव सामन्यांत आपली छाप पाडली आहे. याशिवाय रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन अनुभवी फिरकी गोलंदाजांमुळे भारत एकंदर पाच गोलंदाजांसह खेळेल.
रोहित शर्मा आणि शिखर धवन भारताच्या डावाला सुरुवात करतील. उपकर्णधार विराट कोहली तिसऱ्या, अजिंक्य रहाणे चौथ्या आणि धोनी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरू शकेल. भारतीय संघातून सुरेश रैनाला वगळल्यामुळे सहाव्या स्थानावर मनीष पांडे किंवा गुरकिराट सिंग यापैकी एक नवा चेहरा दिसू शकेल. मनीषने मागील वर्षी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत दमदार एकदिवसीय पदार्पण केले होते. सराव सामन्यातही त्याने ५८ धावांची खेळी साकारली आहे. त्यामुळे मनीषचे पारडे जड असले तरी गुरकिराटने पंजाब आणि भारत ‘अ’ संघाकडून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन केले आहे. धोनी संघनिवड करताना सराव सामन्यातील कामगिरीकडे मुळीच गांभीर्याने पाहात नाही. त्यामुळे त्याने मनीषऐवजी गुरकिराटला प्राधान्य दिल्यास मुळीच आश्चर्य वाटू नये.
वेगवान गोलंदाज रिशी धवन हा आणखी एक अष्टपैलू पर्याय भारताकडे उपलब्ध आहे. मात्र त्याच्या वेगाची आणि फलंदाजीची ऑस्ट्रेलियातील खेळपट्टय़ांवर आधी चाचणी घ्यायची आवश्यकता आहे.
ट्वेन्टी-२० विश्वचषकापर्यंत भारताचे नेतृत्व सांभाळणार असल्यामुळे धोनीसाठी हे वर्ष महत्त्वाचे आहे. त्यामुळे नेतृत्वासह धोनी कशी फलंदाजी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीवर भारताचे भवितव्य अवलंबून
असेल.
मागील वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकाप्रसंगी उमेश, शमी आणि मोहित या त्रिकुटाने भारताच्या वेगवान माऱ्याची जबाबदारी पार पाडली. गुडघ्याला झालेल्या दुखापतीची तमा न बाळगता बंगालच्या शमीने गोलंदाजी केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीच्या आक्रमणाला रोखणे हे भारतीय गोलंदाजांपुढे मोठे आव्हान असेल. स्मिथची बॅट तळपल्यास दिग्गज गोलंदाजही नतमस्तक होतात, तर वॉर्नर गोलंदाजांवर जोरदार आक्रमण चढवतो. आरोन फिन्च आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्याकडे सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता आहे. याशिवाय संघाचा डाव उभारू शकणारा माजी कर्णधार जॉर्ज बेली त्यांच्याकडे आहे. भारतीयांना पुरेसा ज्ञात असलेला जेम्स फॉल्कनर हा कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटू शकतो. २०१३ च्या मालिकेत फॉल्कनरने इशांतवर जोरदार हल्ला चढवला होता.

संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रिशी धवन, शिखर धवन, गुरकिराट सिंग मान, रवींद्र जडेजा, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, रोहित शर्मा, बरिंदर सरण, उमेश यादव.
ऑस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), जॉर्ज बेली, स्कॉट बोलँड, जेम्स फॉल्कनर, आरोन फिन्च, जोश हॅझलवूड, मिचेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, जोएल पॅरिस, केन रिचर्डसन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर.
सामन्याची वेळ : सकाळी ८.५० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, ३ आणि एचडी १वाहिनीवर.

बरिंदर सरणची गोलंदाजी मी भारतामध्ये पाहिली आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आम्ही अनभिज्ञ नाही. भारतीय संघात चांगले युवा अष्टपैलू खेळाडू आहेत. विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा यांच्या विकेट्स आमच्यासाठी महत्त्वाच्या असतील. कारण त्यांनी जास्त धावा केल्या तर आम्हाला ती धोक्याची घंटा ठरू शकते. त्यामुळे हे तिघेही आमच्या रडारवर असतील.
स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

प्रत्येक आव्हान ही एक संधी असते. हा दौरा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. संघात गुणी अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे तीन गोलंदाज आणि दोन अष्टपैलू खेळाडूंसह मैदानात उतरणार आहोत. मनीष पांडे आणि गुरुकरट सिंग यांच्यापैकी आम्हीं एकाला संधी देणार आहोत. या संघात चांगला समन्वय असून युवा खेळाडूंना या दौऱ्यात नक्की संधी मिळेल.
– महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार