X

अजिंक्य रहाणेला बाहेर ठेवणे शहाणपण नव्हे- सुनील गावसकर

निवड समितीने याबाबत उत्तर द्यावे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत अजिंक्य रहाणेला वगळल्याच्या निवड समितीचा निर्णय लिटल मास्टर सुनील गावसकर यांना पटलेला नाही. एकदिवसीय मालिकेत सलग चार अर्धशतके साजरी करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या जागी आगामी टी-२० स्पर्धेसाठी के राहुलची निवड करण्यात आली. निवड समितीच्या या निर्णयावर गावसकर म्हणाले, सलग चार अर्धशतके ठोकून स्वत:ला सिध्द करणाऱ्या फलंदाजाला संघात स्थान न देण्याची भूमिका हैराण करणारी आहे. के राहुल हा चांगला फलंदाज आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील एकही सामना तो खेळलेला नाही. त्यामुळे टी-२० मालिकेच्यादृष्टीने त्याची निवड योग्य वाटत नाही, असे गावसकर यांनी म्हटले आहे. रहाणेला टी-२० सामन्यांसाठी संघात का संधी दिली नाही, याचे उत्तरही द्यावे, असे ते म्हणाले.

त्यांनी जलदगती गोलंदाज आशिष नेहराच्या पुनरागमनाचे स्वागत केले. वयाच्या तिशीनंतर कोणत्याही खेळाडूसाठी संघात स्थान मिळवणे सोपे नसते. नेहराने वयाच्या ३८ वर्षी संघात स्थान मिळवले असून त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला ७ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा विजय मिळवल्यानंतर ही मालिका जिंकून आयसीसीच्या टी-२० क्रमवारीतील स्थान सुधारण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. निवड समितीने या मालिकेसाठी दिनेश कार्तिकला संघात स्थान दिले आहे.

Outbrain