ऑस्ट्रेलियाला ३६९ धावांवर रोखले; दुसऱ्या दिवसअखेर भारत २ बाद ६२

भारताच्या नवख्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३६९ धावांत रोखण्याची किमया साधली. परंतु चुकीचा फटका खेळून रोहित शर्मा बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पारडे जड मानले जात आहे. शनिवारी चहापानानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. भारताने तोवर २ बाद ६२ अशी मजल मारली होती.

भारताची सुरुवात खराब झाली. पॅट कमिन्सने शुभमन गिलचा (७) अडसर दूर केला. पण सलामीवीर रोहितने दिमाखदार प्रारंभ करीत ७४ चेंडूंत सहा चौकारांसह ४४ धावा केल्या. त्याने चेतेश्वर पुजाराच्या साथीने दुसऱ्या गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी केली. शंभरावी कसोटी खेळणाऱ्या नॅथन लायनने मिचेल स्टार्ककरवी रोहितला झेलबाद करीत अर्धशतकापासून रोखले. खेळ थांबला, तेव्हा पुजारा आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे ८ आणि २ धावांवर होते. चहापानाआधीच्या ६.१ षटकांत या दोघांनी फक्त दोन धावा काढल्या.

दिवसाचे पहिले सत्र भारताच्या गोलंदाजांनी गाजवले. ऑस्ट्रेलियाचा उर्वरित निम्मा संघ ९५ धावांत गुंडाळून त्यांना मोठ्या धावसंख्येपासून रोखले. शार्दुल ठाकूर (३/९४) याच्यासह वॉशिंग्टन सुंदर (३/८९) आणि थंगारासू नटराजन (३/७८) या दोन पदार्पणवीरांनी हे यश मिळवले. मोहम्मद सिराजला फक्त पहिल्या दिवशी एकमेव बळी मिळाला होता.

पहिल्या दिवसाच्या ५ बाद २७४ धावसंख्येवरून ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला. टिम पेन (५०) आणि कॅमेरून ग्रीन (४७) यांनी ९८ धावांची भागीदारी केली. ठाकूरच्या गोलंदाजीवर पेनचा रोहितने दुसऱ्या स्लिपमध्ये सुरेख झेल टिपल्याने ही भागीदारी खंडित झाली. पेन बाद झाल्यावर ग्रीनला एकाग्रता टिकवणे कठीण गेले. वॉशिंग्टनने त्याचा त्रिफळा उडवला. त्यानंतर ठाकूरने पॅट कमिन्सला (२) पायचीत करीत ऑस्ट्रेलियाची ५ बाद ३११ धावसंख्येवरून ८ बाद ३१५ अशी अवस्था केली. परंतु नॅथन लायन (२२) आणि स्टार्क (२०) यांनी १०व्या गड्यासाठी ३९ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला साडेतीनशे धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला.

सर्वाधिक अनुभवी गोलंदाजाकडे तीन कसोटी सामन्यांचा अनुभव अशी हेटाळणी केली जाणाऱ्या भारताच्या गोलंदाजांनी परिस्थिती नियंत्रणात राखली. याआधीच्या तीन कसोटी सामन्यांत पाच महत्त्वाचे गोलंदाज जायबंदी झाल्यामुळे भारताला नटराजन आणि वॉशिंग्टन यांना पदार्पणाची संधी देण्याशिवाय पर्यायच उरला नव्हता.

वॉशिंग्टनने भूमिका चोख बजावली -मॅक्डोनाल्ड

रविचंद्रन अश्विनच्या जागी खेळणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने शिस्तबद्ध गोलंदाजी करीत त्याची जागा चोख बजावली. भारताच्या अननुभवी गोलंदाजीच्या माऱ्याने लक्षणीय कामगिरी बजावली, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियाचे साहाय्यक प्रशिक्षक अ‍ॅन्ड्र्यू मॅकडरमॉट यांनी प्रशंसा केली. ‘‘नटराजनकडे अनुभवाची कमतरता असली तरी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील अनुभवाच्या बळावर त्याने पहिल्या कसोटीत टिच्चून गोलंदाजी केली,’’ असे मॅक्डरमॉट यांनी सांगितले.

‘त्या’ फटक्याची खंत नाही? -रोहित

चुकीचा फटका खेळल्याचे भारताचा उपकर्णधार रोहितने अमान्य केले. नॅथन लायनच्या गोलंदाजीवर खेळलेल्या फटक्याची मला कोणतीही खंत वाटत नाही. किंबहुना मी पुन्हा तो खेळेन, अशी ग्वाही रोहितने दिली. ‘‘गोलंदाजांवर दडपण आणण्यासाठी मी नेहमी योजनाबद्ध फलंदाजी करतो. लायन हा तरबेज गोलंदाज असल्याने त्याने मला अडचणीत आणले, एवढेच यातील महत्त्वाचे आहे,’’ असे रोहितने सांगितले. यावेळी रोहितने नटराजन, सिराज, सुंदर आणि शार्दुल या गोलंदाजांच्या चौकडीचे कौतुक केले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ११५.२ षटकांत सर्व बाद ३६९ (मार्नस लबूशेन १०८, टिम पेन ५०, मॅथ्यू वेड ४५; टी. नटराजन ३/७८, शार्दुल ठाकूर ३/९४, वॉशिंग्टन सुंदर ३/८९)

भारत (पहिला डाव) : २६ षटकांत २ बाद ६२ (रोहित शर्मा ४४; पॅट कमिन्स १/२२)

वेळ : पहाटे ४.३० वा. ’ थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन १, सोनी टेन ३, एचडी वाहिन्या