करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया सरकारने पुढील सहा महिने सीमारेषाबंदीचे निर्बंध घातल्यामुळे भारताचा बहुप्रतीक्षित ऑस्ट्रेलिया दौरा अडचणीत सापडला आहे.

ऑक्टोबर महिन्यात भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार होता. या दौऱ्याची सुरुवात तिरंगी ट्वेन्टी-२० स्पर्धेने होणार होती, तर शेवट कसोटी मालिकेने होणार होता. ट्वेन्टी-२० स्पर्धेनंतर भारतीय संघासमोर ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आव्हानसुद्धा होते. परंतु करोनामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकापुढेही अनिश्चितता पसरली आहे.

सध्या ऑस्ट्रेलियात दोन हजारांहून अधिक व्यक्तींना करोनाची बाधा झाली असून १६ जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सरकारने देशाच्या सीमारेषा बंद केल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) अद्याप इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचा निर्णय घेऊ  शकलेले नाही. याचप्रमाणे भारताची आंतरराष्ट्रीय कार्यक्रमपत्रिकासुद्धा बिघडणार आहे. कारण ‘आयपीएल’नंतर श्रीलंका (एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० मालिका), झिम्बाब्वे, आशिया चषक (ट्वेन्टी-२०) या आव्हानांनंतर मायदेशात इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका भारतीय संघ खेळणार होता.

सहा महिने प्रवासबंदी म्हणजेच कोणताही संघ या कालावधीत ऑस्ट्रेलियात जाऊ शकणार नाही. याविषयी ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘‘सध्या तरी या संदर्भात कोणतेही भाष्य करणे उचित ठरणार नाही. कारण परिस्थिती निवळल्यास बंदी उठवली जाऊ शकते. मात्र ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा समावेश असलेली तिरंगी स्पर्धा होणे अवघड आहे.’’

सहा महिन्यांच्या प्रवासाच्या र्निबधांमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे नियोजन करणे कठीण जाईल. विमान प्रवास प्रक्रिया करणेही अवघड जाईल, असे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा भाग असलेली भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार कसोटी सामन्यांची मालिकासुद्धा रद्द होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

करारबद्ध क्रिकेटपटूंची यादी पुढील महिन्यात

मेलबर्न : करोना विषाणू संसर्गाच्या आव्हानामुळे वार्षिक करारबद्ध क्रिकेटपटूंची यादी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडून एक महिन्यानंतर घोषित करण्यात येणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंचे करार हे मे २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीचे असतील आणि ते पुढील महिन्यात जाहीर होतील, असे ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने स्पष्ट केले आहे.