पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारत ब संघाने प्रो. देवधर चषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. रांचीच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारत ब संघाने भारत क संघावर ५१ धावांनी विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून पार्थिव पटेलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड भोपळाही न फोडता माघारी परतल्यामुळे भारत ब संघाची सुरुवात खराब झाली. यानंतर कर्णधार पार्थिव पटेलही झटपट माघारी परतला. यानंतर यशस्वी जैस्वाल आणि केदार जाधव यांनी अर्धशतकी खेळी करत भारत ब संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. जैस्वालने ५४ तर केदार जाधवने ८६ धावा केल्या. अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनीही फटकेबाजी करत भारत ब संघाला २८३ धावांपर्यंत मजल मारुन दिली. भारत क संघाकडून इशान पोरेलने ५ तर जलज सक्सेना आणि अक्षर पटेलने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल भारत क संघाची सुरुवातही खराब झाली. कर्णधार शुभमन गिल अवघी १ धाव काढून माघारी परतला. यानंतर प्रियम गर्गने मयांक अग्रवालच्या जोडीने , संघाचा डाव सावरला. मात्र ही जोडी फुटल्यानंतर भारत क ची घसरगुंडी उडाली. अखेरच्या फळीत अक्षर पटेल, जलज सक्सेना आणि मयांक मार्कंडे यांनी फटकेबाजी करत छोटेखानी खेळी केल्या, मात्र त्यांची झुंज अपयशीच ठरली. भारत ब संघाकडून शाहबाज नदीमने ४, मोहम्मद सिराजने २, रुष कलारियाने १ बळी घेतला.