12 August 2020

News Flash

आशेच्या हिंदोळ्यावर…

भारतीय बॅडमिंटनमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत आहेत.

टोक्यो ऑलिम्पिकला अवघे साताठ महिने शिल्लक असताना भारताला पुरुष दुहेरी आणि महिला एकेरी या गटातील खेळाडूंकडूनच पदकाच्या अपेक्षा बाळगता येतील, असेच सध्या तरी वाटते आहे.

ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com

भारतीय बॅडमिंटनमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत आहेत. एकीकडे पुरुष व महिला एकेरीत भारताच्या खेळाडूंची कामगिरी ढासळत असताना पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यशाची शिखरे पादाक्रांत करत आहेत. आगामी टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतसुद्धा यांच्याकडूनच चाहत्यांना आशा आहेत. या पाश्र्वभूमीवर भारतीय खेळाडूंच्या गेल्या दोन-तीन महिन्यांतील कामगिरीचाच वेध.

गेल्या शनिवारी झालेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्त्विक-चिराग यांना पुरुष दुहेरी गटात विजेतेपदाने हुलकावणी दिली. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यामुळे वर्षांतील दुसरे विजेतेपद मिळवण्यात ते अपयशी ठरले असले तरी यंदाच्या वर्षभरातील चमकदार कामगिरीमुळे बऱ्याच काळानंतर भारतीय बॅडमिंटनला दुहेरीत दिलासादायी आशा निर्माण झाल्या आहेत.

१९ वर्षीय सात्त्विक आणि २२ वर्षीय चिराग यांच्या जोडीला गतवर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते, परंतु त्यांच्या कामगिरीची दखल संपूर्ण विश्वाने त्या स्पर्धेदरम्यानच घेतली. २०१८ मध्येच हैदराबाद बॅडमिंटन स्पर्धेतील विजेतेपद आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील उपविजेतेपद त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले.

मात्र सात्त्विक-चिराग यांचा खऱ्या अर्थाने उदय झाला तो २०१९ या वर्षांत. ऑगस्टमध्ये झालेल्या थायलंड बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावून या भारतीय जोडीने आगळावेगळा विक्रम रचला. बीडब्ल्यूएफ सुपर ५०० पातळीवरील स्पर्धा जिंकणारी ही भारताची पहिलीवहिली पुरुष दुहेरी जोडी ठरली.

ऑगस्ट महिन्याच्याच अखेरीस झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत या जोडीला उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच मजल मारता आली. सप्टेंबरमध्ये झालेल्या डेन्मार्क, कोरिया स्पर्धामध्ये या जोडीला अनुक्रमे दुसऱ्या व उपउपांत्यपूर्व फेरीतून गाशा गुंडाळावा लागला; परंतु त्यानंतर या दोघांनी मागे वळून न पाहता सातत्याने कामगिरीचा आलेख उंचावला.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या फ्रेंच बॅडमिंटन स्पर्धेत सात्त्विक-चिराग यांना विजेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली. इंडोनेशियाची अग्रमानांकित जोडी मारकस गिदोन आणि केव्हिन संजया यांनी त्यांना नमवले, तर नुकत्याच झालेल्या चीन बॅडमिंटन स्पर्धेतही याच जोडीने सात्त्विक-चिरागला या वेळी उपांत्य फेरीत धूळ चारली; परंतु दोन्ही स्पर्धासाठी मानांकनही लाभलेले नसताना त्यांनी अनेक मानांकित खेळाडूंच्या नाकीनऊ आणले.

चिराग लांब स्मॅशेस आणि नेटजवळून फटक्यांचा खेळ करण्यात पटाईत आहे, तर सात्त्विक लाँग रॅलीज खेळण्यात आणि कोर्टवर वाकडे फटके खेळण्यात वाकबगार आहे. मुख्य म्हणजे दोघांच्याही वयात फक्त तीन वर्षांचे अंतर असल्यामुळे आगामी १० वर्षे तरी ही जोडी अविरतपणे भारतासाठी खेळू शकते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूची कामगिरी गेल्या काही महिन्यांपासून ढासळली आहे. जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर झालेल्या कोरिया, डेन्मार्क, फ्रेंच आणि चीन या चार स्पर्धापैकी एकाही स्पर्धेत सिंधूला किमान उपांत्यपूर्व फेरी गाठणेही जमले नाही. त्यातच चीन बॅडमिंटन स्पर्धेत तर क्रमवारीत ४२व्या स्थानी असलेल्या खेळाडूने सिंधूला नेस्तनाबूत केले. २४ वर्षीय सिंधूला महत्त्वांच्या स्पर्धामध्ये कशी कामगिरी करायची, हे ठाऊक असले तरी बीडब्ल्यूएफ स्पर्धातील कामगिरीही तिच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे सिंधूसारख्या अनुभवी खेळाडूने लवकरच विजयी पुनरागमन करावे, अशीच तमाम बॅडमिंटनप्रेमींची इच्छा आहे.

सिंधूव्यतिरिक्त भारताची महिला एकेरीतील अनुभवी खेळाडू म्हणजे सायना नेहवाल. परंतु या २९ वर्षीय खेळाडूला यावर्षी इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेव्यतिरिक्त एकही विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्याचप्रमाणे तिची तंदुरुस्तीची पातळीसुद्धा खालावलेली दिसत आहे. त्यामुळे सायनाकडून ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या आशा फाच कमीच आहेत.

पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत, समीर वर्मा, बी. साईप्रणीत, पारुपल्ली कश्यप आणि एच. एस. प्रणॉय यांपैकी एकालाही गेल्या तीन महिन्यांत झालेल्या कोणत्याही स्पर्धेचे विजेतेपद मिळवणे जमलेले नाही. यांमधील सर्वात अनुभवी म्हणजे श्रीकांत. २०१७ मध्ये चार विजेतेपदे मिळवणाऱ्या श्रीकांतने यावर्षी निराशाजनक खेळ केलेला आहे. त्यांची देहबोलीतसुद्धा सकारात्मकता जाणवत नसून क्रमवारीतील त्याच्याहून खालचे खेळाडू त्याला सहज पराभूत करत आहेत. चीन स्पर्धेतून त्याने माघार घेतली, तर कोरिया आणि डेन्मार्क स्पर्धेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या फेरीत त्याचे आव्हान संपुष्टात आले.

साईप्रणीतने जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवून एकेरीतील आशा उंचावल्या. परंतु त्यानंतर त्याचीही कामगिरी ढासळतेच आहे. कश्यपने जपान स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. परंतु अन्य स्पर्धात त्याच्याही पदरी निराशाच पडली. त्यामुळे पुरुष एकेरी हा भारतासाठी सध्याच्या घडीला सर्वाधिक डोकेदुखीचा विषय ठरत आहे.

पुरुष दुहेरीत चिरागच्या साथीने दमदार कामगिरी करणाऱ्या सात्त्विकला मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पाच्या साथीने विजय मिळवणे कठीण जात आहे. त्याचप्रमाणे महिला दुहेरीत अश्विनी आणि एन सिक्की रेड्डी यांची कामगिरीही साधारणच राहिली आहे. त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिकला अवघे साताठ महिने शिल्लक असताना भारताला पुरुष दुहेरी आणि महिला एकेरी या गटातील खेळाडूंकडूनच पदकाच्या अपेक्षा बाळगता येतील, असेच सध्या तरी वाटते आहे.

आमच्या कामगिरीमुळे दुहेरीतील खेळाडूंकडून अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. एकेरीतील खेळाडूंच्या अपयशामुळे चाहते आमच्याकडून आशा बाळगून आहेत, याची मला व सात्त्विकला जाणीव आहे. परंतु वैयक्तिकदृष्टय़ा या अपेक्षांचे अतिरिक्त ओझे मी घेणार नाही. सात्त्विक आणि मला एकमेकांच्या सक्षम बाजू चांगल्या ठाऊक असल्याने फावल्या वेळेतसुद्धा आम्ही एकमेकांच्या कच्च्या दुव्यांविषयी चर्चा करतो. आताशी आमच्या कारकीर्दीने भरारी घेतली असून भविष्यात भारतासाठी दुहेरीतील पहिलेवहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचेच ध्येय आम्ही डोळ्यांसमोर ठेवले आहे.

– चिराग शेट्टी, भारतीय बॅडमिंटनपटू

सात्त्विक-चिराग यांची या वर्षांतील कामगिरी नक्कीच अभिमानास्पद आहे. परंतु त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या असून ऑलिम्पिकच्या दृष्टीने सर्व विरोधी खेळाडू त्यांच्याविरुद्ध अधिक तयारीनिशी कोर्टवर उतरतील. त्यामुळे सात्त्विक-चिराग यांनी या प्रगतीमुळे हुरळून न जाता आणखी मेहनतीवर भर द्यावा. त्याचप्रमाणे एकेरीत सिंधू वगळता अन्य खेळाडूंनी कामगिरी उंचावण्याची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंना निराशेचा सामना करावा लागू शकतो.

– उदय पवार, चिरागचे प्रशिक्षक

सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 1:01 am

Web Title: india badminton
Next Stories
1 मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : शुभमच्या अष्टपैलू योगदानामुळे मुंबईचा सलग पाचवा विजय
2 जागतिक दर्जाच्या गोलंदाजांची कसोटी क्रिकेटमध्ये कमतरता!
3 भारतीय संघात लिएण्डर पेसचे पुनरागमन
Just Now!
X