निमंत्रितांच्या हॉकी स्पर्धेत मलेशियावर ४-१ गोलने मात

जोरदार आक्रमणाच्या जोरावर भारताने मलेशियाचा ४-१ असा पराभव करीत चार देशांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. भारताने या सामन्यात सुरुवातीपासून नियंत्रण राखले होते. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला आकाशदीपसिंग याने बीरेंद्र लाक्रा याच्या पासवर भारताचे खाते उघडले. या गोलच्या आधारे पूर्वार्धात भारताने १-० अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात भारताकडून कर्णधार व्ही. आर. रघुनाथ (४५वे मिनिट), तलविंदरसिंग (५२वे मिनिट) व रूपींदरपालसिंग (५७वे मिनिट) यांनी गोल करीत संघाच्या विजयास हातभार लावला. मलेशियाचा एकमेव गोल जोएल व्हान हुईझेन याने ४८व्या मिनिटाला नोंदविला. या सामन्यात भारतास आणखी किमान तीन गोल नोंदविता आले असते. त्यांना सात पेनल्टी कॉर्नर मिळाले व त्यापैकी दोन पेनल्टी कॉर्नरद्वारा त्यांनी गोल केले.

[jwplayer jPX7MVNf]

अंतिम फेरीची संधी हुकल्यानंतर किमान कांस्यपदक मिळविले पाहिजे या हेतूनेच भारतीय खेळाडूंनी या सामन्यात धडाकेबाज खेळ केला. दुसऱ्याच मिनिटाला बीरेंद्र लाक्रा याने जोरदार चाल करीत मलेशियाच्या गोलपोस्टपर्यंत मुसंडी मारली. त्याने दिलेल्या पासवर आकाशदीप याने सहज गोल केला. त्यानंतर अनेक वेळा संधी मिळूनही भारताला पूर्वार्धात आणखी गोल नोंदविता आला नाही. उत्तरार्धाच्या प्रारंभापासून पुन्हा भारताच्या खेळाडूंनी सातत्याने चाली केल्या. सामन्याच्या ४५व्या मिनिटाला त्यांना पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत रघुनाथ याने गोल केला. मलेशियाच्या हुईझेन याने त्यानंतर तीन मिनिटांनी गोल करीत उत्तर दिले. तथापि, ५२व्या मिनिटाला पुन्हा भारतास गोल करण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा घेत तलविंदर याने गोल केला व भारतास ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या ५७व्या मिनिटाला भारतास सातवा पेनल्टी कॉर्नर मिळाला. हुकमी ड्रॅगफ्लिकर रूपींदर याने अचूक फटका मारून गोल केला. या स्पर्धेतील त्याचा हा सहावा गोल होता. हा गोल झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी भक्कम बचाव करीत ४-१ असा विजय मिळविला.

महिला संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला निराशाजनक कामगिरीस सामोरे जावे लागले. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्यांना ऑस्ट्रेलियाकडून १-३ असा पराभव स्वीकारावा लागला. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने २-१ असा विजय मिळविला. भारताने या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळविला होता. त्यानंतर त्यांना सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. वंदना कटारियाने भारतातर्फे एकमेव गोल केला. ऑस्ट्रेलियातर्फे ब्रुकी पेरीस, गॅबी नान्सी यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारताच्या दीपिकाकुमारी हिला मालिकेतील सवरेत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला.

[jwplayer uKgm2S1B]