भारत-बांगलादेश कसोटी मालिका

कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणाऱ्या भारत-बांगलादेश यांच्यातील प्रकाशझोतामधील दुसऱ्या कसोटीची चर्चा ऐरणीवर आहे. याच ‘गुलाबी वातावरणात’ गुरुवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचे पारडे जड आहे.

भारत-बांगलादेश मालिकेतील पहिला कसोटी सामना हा लाल चेंडूने खेळवण्यात येणार आहे. परंतु दोन्ही संघ प्रकाशझोतातील त्यांच्या पहिल्यावहिल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी उत्सुक आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २४० गुणांसह अग्रस्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवणाऱ्या भारताशी सामना करणे हे बांगलादेशसाठी आव्हानात्मक ठरेल.

२०१४च्या इंग्लंड दौऱ्यात मी खचलो होतो -कोहली

इंदूर : ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने मानसिक आरोग्य बिघडल्याचे मान्य केले, हे उल्लेखनीय आहे. मीसुद्धा २०१४च्या इंग्लंड दौऱ्यात मानसिकदृष्टय़ा खचलो होतो. काय करावे, कुणाशी संवाद साधावा, हेच कळत नव्हते, अशी कबुली भारताचा कर्णधार विराट कोहलीने दिली आहे. मानसिक समस्येचा सामना करणाऱ्या मॅक्वेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांतीचा निर्णय घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कोहली म्हणाला, ‘‘आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूमध्ये संवादाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळेच मॅक्सवेलने उघडपणे मतप्रदर्शन करणे मला योग्य वाटते. मी २०१४च्या इंग्लंड दौऱ्यावर धावांसाठी झगडत असताना अशाच खडतर कालखंडातून गेलो आहे. त्यावेळी कुणाशी बोलावे, हेच कळत नव्हते.’’

भारताकडे भक्कम फलंदाजीची फळी

भारताकडे विराट कोहली (२६ शतके), अजिंक्य रहाणे (११ शतके), चेतेश्वर पुजारा (१८ शतके) यांच्यासारखे कसोटी क्रिकेटमधील मातब्बर फलंदाज आहेत. या तिघांचा सामना करण्याआधी रोहित शर्मा आणि मयांक अगरवाल या धडाकेबाज सलामीवीरांसमोर बांगलादेशच्या गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना भारताने २०३ धावांनी जिंकला, मग उर्वरित दोन सामन्यांत भारताने डावाने विजय प्राप्त केला. सलामीवीराच्या नव्या भूमिकेत यशस्वी ठरणाऱ्या मालिकावीर पुरस्कार विजेत्या रोहितने तीन शतकांसह एकूण ५२९ धावा केल्या. मयांकने त्याला तोलामोलाची साथ देताना दोन शतकांसह ३४० धावा केल्या. विराटच्या खात्यावरही (एकूण ३१७ धावा) एक द्विशतक जमा होते. याशिवाय अजिंक्य रहाणे (एकूण २१६ धावा) आणि रवींद्र जडेजा (एकूण २१२ धावा) यांनीही आपली भूमिका चोख पार पाडली.

शमी-उमेशसह इशांतला खेळवण्याचे संकेत

मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यावर भारताच्या वेगवान माऱ्याची धुरा असेल, तर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन फिरकी गोलंदाजीची सूत्रे सांभाळतील. अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळवण्यापेक्षा इशांत शर्मा हा तिसरा वेगवान गोलंदाज खेळवणार असल्याचे संकेत कोहलीने दिले आहेत. ‘‘खेळपट्टीचा विचार करता उमेश आणि शमी यांच्याकडून प्रमुख अपेक्षा आहेत. जसप्रीत बुमरा अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. परंतु गेली दोन वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये इशांत शर्मा हा सातत्याने यशस्वी गोलंदाजी करीत आहे. त्याच्या खात्यावर पुरेसे बळीसुद्धा असतात. कठीण प्रसंगात त्याचा अनुभव नेहमीच संघाला तारतो,’’ असे मत कोहलीने व्यक्त केले आहे.

बांगलादेशच्या फलंदाजांचे कौशल्य पणाला

कसोटी क्रिकेट प्रकारात कमकुवत संघ म्हणूनच बांगलादेशची गणना केली जाते. ११५ सामन्यांपैकी फक्त १३ विजय, १६ अनिर्णित आणि ८६ पराभव अशी त्यांची कसोटी क्रिकेटमधील आकडेवारी आहे. त्यामुळेच तमिम इक्बाल आणि निलंबित शाकिब अल हसन यांच्याशिवाय खेळणाऱ्या बांगलादेशच्या कामगिरीविषयी भाकीत करणे अवघड आहे. त्यांचा सर्वोत्तम फलंदाज कर्णधार मोमिनूल हकच्या खात्यावर १० कसोटी शतकेसुद्धा जमा नाहीत. मुशफिकूर रहिम आणि महमुदुल्ला रियाद हे झुंजार कामगिरी करणारे क्रिकेटपटू आहेत. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये त्यांना अद्याप स्वत:ला सिद्ध करता आलेले नाही. जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजीच्या माऱ्याचा सामना करताना बांगलादेशच्या फलंदाजांचे कौशल्य पणाला लागणार आहे. याआधी बांगलादेशचा अफगाणिस्तानविरुद्ध अखेरचा कसोटी सामना झाला होता. शाकिबच्या नेतृत्वाखाली बांगलादेशने तो सामना गमावला होता.

७ भारत-बांगलादेश यांच्यात आतापर्यंत झालेल्या ९ कसोटी सामन्यांपैकी ७ सामने भारताने जिंकले आहेत, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.

१२ भारतीय संघ बांगलादेशविरुद्धची मालिका जिंकून सलग १२व्या कसोटी मालिकेतील विजयासाठी उत्सुक आहे.

३२ कर्णधारपद सांभाळताना पाच हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी कोहलीला ३२ धावांची आवश्यकता आहे.

१ सर्वाधिक शतके झळकावणारा कर्णधार होण्यासाठी कोहलीला एका शतकाची आवश्यकता आहे. सध्या कोहली आणि रिकी पाँटिंग यांच्या खात्यावर १९ शतके आहेत.

संघ

भारत (अंतिम १२) : रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, कुलदीप यादव.

बांगलादेश : मोमिनूल हक (कर्णधार), इम्रूल कायेस, मुशफिकूर रहिम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला रियाद, मोहम्मद मिथुन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, मुस्ताफिझूर रेहमान, नईम, हसन, सैफ हसन, शदमान इस्लाम, तैजूल इस्लाम, अबू जायेद, ईबादूत हुसैन, अल अमिन हुसैन.

सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वाजल्यापासून.   थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी,