भारत-बांगलादेश ट्वेन्टी-२० मालिका

खराब हवामानामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना अखेरच्या क्षणी रद्द करणे अशक्य आहे. परंतु भविष्यात दिवाळीनंतरच्या काही दिवसांत उत्तर भारतात सामने घेतले जाणार नाही, याची काळजी घेऊ, असे मत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने व्यक्त केले.

‘‘गेले दोन दिवस माझे दिल्ली प्राधिकरणाशी बोलणे सुरू आहे. सामन्यासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता कोणताही बदल करता येणार नाही. मात्र भविष्यात याविषयी अधिक वास्तववादी विचार करण्याची आवश्यकता आहे,’’ असेही गांगुलीने सांगितले.

दिल्लीच्या हवेची चिंता कशाला? -रोहित

नवी दिल्ली : राजधानीतील प्रदूषणाचे संकट रविवारी होणाऱ्या भारत-बांगलादेश यांच्यातील पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यावर असताना ‘‘दिल्लीच्या हवेची चिंता कशाला?’’ असे हजरजबाबी उत्तर उपकर्णधार रोहित शर्माने दिले आहे. पर्यावरणतज्ज्ञ तसेच माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी दिल्लीच्या प्रदूषणाबाबत चिंता प्रकट करून पहिला ट्वेन्टी-२० सामना हलवण्याची विनंती केली होती; परंतु हा सामना नियोजित कार्यक्रम पत्रिकेनुसारच होईल, असे स्पष्टीकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिले आहे. ‘‘श्रीलंकेविरुद्ध आम्ही खेळलेल्या कसोटी सामन्यात कोणतीही समस्या जाणवली नाही. त्यामुळे या सामन्यासंदर्भातील चर्चेची आणि समस्येची मला कोणतीही माहिती नाही,’’ असे रोहितने सांगितले. फिरोझशाह कोटला स्टेडियमवर बांगलादेशचा संघ गुरुवारी प्रथमच सरावासाठी उतरला. लिटन दासने प्रदूषणापासून संरक्षण करणारा मुखवटा घालूनच फलंदाजीचा कसून सावध सराव केला.