कारकीर्दीतील दुसरी द्विशतकी खेळी; भारताची ६ बाद ४९३ अशी आव्हानात्मक धावसंख्या

भारत-बांगलादेश कसोटी मालिका :-सलामीवीर मयंक अगरवालने बांगलादेशच्या गोलंदाजीच्या माऱ्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवताना कारकीर्दीतील सर्वोत्तम अशी दुसरी द्विशतकी खेळी साकारली. त्यामुळेच भारताला पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात ६ बाद ४९३ अशी आव्हानात्मक धावसंख्या शुक्रवारी उभारता आली.

मयंकने तिसरी शतकी खेळी साकारताना ३३० चेंडूंत ८ षटकार आणि २८ चौकारांसह २४३ धावा काढल्या. त्यामुळे भारताने ३४३ धावांची महाआघाडी घेतली होती. शुक्रवारच्या दिवसावर मयंकने एकटय़ाने छाप पाडली. रोहित शर्मा (६) आणि कर्णधार विराट कोहलीने (०) निराशा केली, तरी चेतेश्वर पुजारा (७२ चेंडूंत ५४ धावा), अजिंक्य रहाणे (१७१ चेंडूंत ८६ धावा) आणि रवींद्र जडेजा (७६ चेंडूंत ६०* धावा) यांच्या साथीने त्याने हिमतीने किल्ला लढवला.

मयंकने सकाळच्या सत्रात पुजारासह दुसऱ्या गडय़ासाठी ९१ धावांची भागीदारी केली, तर रहाणेसमवेत चौथ्या गडय़ासाठी केलेली १९० धावांची बहुमोल भागीदारी भारताच्या डावाला मजबुती देणारी ठरली. त्यानंतर मयंकने जडेजाच्या साथीने पाचव्या गडय़ासाठी २३.५ षटकांत १२३ धावांची आणखी एक भागीदारी केली. त्यामुळे भारताने पहिला डाव सध्याच्या धावसंख्येवर घोषित केल्यास शनिवारी तिसऱ्याच दिवशी हा सामना निकाली ठरू शकेल. कारण भारताच्या वेगवान माऱ्याचा आत्मविश्वासाने सामना करण्याची क्षमता बांगलादेशच्या फलंदाजांकडे नाही.

स्थानिक क्रिकेट आणि भारत ‘अ’ संघाकडून खेळण्याचा पुरेसा अनुभव गाठीशी असणाऱ्या मयंकने दिमाखदार खेळी साकारत क्रिकेटरसिकांची मने जिंकली. वर्षभरापूर्वी मयंकने कसोटी पदार्पण केले. परंतु पृथ्वी शॉ याला प्राधान्य दिल्यामुळे मयंक संघातील स्थान टिकवू शकला नाही. मग पृथ्वीला दुखापत झाल्यामुळे मयंकचा पुनर्विचार करण्यात आला. त्यानंतर त्याने दमदार खेळींसह सलामीवीराचे स्थान पक्के केले आहे.

वेगवान गोलंदाजाला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर दोन विशेषज्ञ फिरकी गोलंदाजांना संघात स्थान देण्याची चूक बांगलादेशला महागात पडली. डावखुरा फिरकी गोलंदाज तैजुल इस्लामने २८ षटकांत १२० धावा दिल्या, तर ऑफ-स्पिनर मेहिदी हसन मिराजने २७ षटकांत ११५ धावा देताना एक बळी मिळवला. मयंकने द्विशतकी खेळीतील आठही षटकार याच दोन फिरकी गोलंदाजांना खेचले. मिराजच्या गोलंदाजीवर लाँग-ऑनला षटकार खेचून मयंकने द्विशतकाचा टप्पा ओलांडला. मग तैजुलच्या गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरला आणखी एक उत्तुंग षटकार मारला. मिराजच्या गोलंदाजीवर नववा षटकार खेचण्याच्या प्रयत्नात मयंक बाद झाला.

रहाणेने १७२ चेंडूंत ९ चौकारांसह ८६ धावा केल्या. शतकाकडे कूच करीत असताना जायेदने त्याला बाद केले. उत्तरार्धात जडेजाने अर्धशतक साकारले, तर उमेश यादवने जोरदार आक्रमण करताना १० चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद २५ धावा केल्या.

बांगलादेशकडून फक्त मध्यमगती गोलंदाज अबू जायेद (२५ षटकांत १०८ धावांत ४ बळी) यशस्वी ठरला. त्याने पुजारा, कोहली आणि रहाणेला तंबूची वाट दाखवली. ईबादत हुसैनच्या (३१ षटकांत ११५ धावांत १ बळी) गोलंदाजीत वेग आणि वैविध्याचा अभाव जाणवला.

धावफलक

बांगलादेश (पहिला डाव) : १५०

ल्ल भारत (पहिला डाव) : मयंक अगरवाल झे. जायेद गो. मिराज २४३, रोहित शर्मा झे. दास गो. जायेद ६, चेतेश्वर पुजारा झे. (बदली) हसन गो. जायेद ५४, विराट कोहली पायचीत गो. जायेद ०, अजिंक्य रहाणे झे. इस्लाम गो. जायेद ८६, रवींद्र जडेजा खेळत आहे ६०, वृद्धिमान साहा त्रि. गो. हुसैन १२, उमेश यादव खेळत आहे २५, अवांतर ७ (लेगबाइज १, नोबॉल ३, वाइड ३), एकूण ११४ षटकांत ६ बाद ४९३.

बाद क्रम : १-१४, २-१०५, ३-११९, ४-३०९, ५-४३२, ६-४५४

गोलंदाजी : ईबादत हुसैन ३१-५-११५-१, अबू जायेद २५-३-१०८-४, तैजुल इस्लाम २८-४-१२०-०, मेहिदी हसन मिराज २७-०-१२५-१, महमुदुल्ला ३-०-२४-०.

काही वर्षांपूर्वी माझ्याकडून धावाच होत नव्हत्या. मोठय़ा धावसंख्येत रूपांतर करण्यात वारंवार अपयश येत होते. परंतु अपयशी ठरण्याच्या याच भीतीने मी स्वत:मध्ये बदल करून मनोधैर्य उंचावले. – मयंक अगरवाल