दुसऱ्या कसोटीसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची व्यूहरचना

भारत-बांगलादेश कसोटी मालिका :- बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या प्रकाशझोतातील कसोटी सामन्यात फलंदाजांना चकवण्यासाठी मी सातत्याने चेंडूच्या दिशेत बदल करेन, अशी प्रतिक्रिया भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने मंगळवारी व्यक्त केली.

जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीत शमी गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या वेगवान माऱ्याचे सक्षमपणे नेतृत्व करत असून बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीतसुद्धा त्याने दोन्ही डावांत मिळून सात बळी मिळवले. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी शमीने व्यूहरचना आखली आहे.

‘‘प्रकाशझोतातील कसोटीविषयी सध्या सगळीकडेच मोठय़ा प्रमाणावर चर्चा रंगत असून गुलाबी चेंडू वेगवान गोलंदाजांना अधिक पोषक ठरेल, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे गोलंदाज या नात्याने खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच मी सातत्याने चेंडूच्या दिशेत बदल करेन. त्याचप्रमाणे फलंदाज दडपणाखाली असेल अथवा माझ्या गोलंदाजीवर चाचपडत असेल तर, मी त्यानुसार गोलंदाजी करून त्याला फटकेबाजी करण्यास भाग पाडेन. कधी उसळते चेंडू टाकून त्याला बॅकफूटवर खेळायला लावेन,’’ असेही शमीने सांगितले.

भारत-बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी शुक्रवार, २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघ पहिल्यांदाच गुलाबी चेंडूने प्रकाशझोतातील सामना खेळणार असल्यामुळे या सामन्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याविषयीही शमीने त्याचे मत मांडले. ‘‘प्रकाशझोतातील सामन्यांमुळे निश्चितपणे कसोटी क्रिकेटला नवचैतन्य प्राप्त होईल. भविष्यात अधिकाधिक प्रकाशझोतातील कसोटी सामने खेळवण्यात यावेत, असे मला वाटते. त्याशिवाय घरच्या चाहत्यांसमोर विशेषत: कुटुंबीयांसमोर खेळण्यासाठी मी उत्सुक असून संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावण्यासाठी पुन्हा सज्ज आहे,’’ असे शमीने सांगितले.