गतविजेत्या भारताने अखेरच्या साखळी लढतीत ऑस्ट्रेलियाला १-० अशा फरकाने पराभूत करून पाचव्या सुल्तान जोहोर चषक कनिष्ठ हॉकी स्पध्रेची अंतिम फेरी गाठली. रविवारी जेतेपदासाठी भारताची गेट्र ब्रिटनशी गाठ पडणार आहे. विजेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्याची अनोखी संधी भारताला असेल.

भारताने आक्रमक पद्धतीने सामन्याला प्रारंभ केला, तर ऑस्ट्रेलियाने बचावावर भर दिला. भारताने प्रतिस्पर्धी संघाला गोल करण्याची संधीच न दिल्यामुळे पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटले. दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाने आक्रमणावर भर दिला, तर भारताने बचावात्मक पवित्रा स्वीकारला. दुसऱ्या सत्रातील ४२व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाकडून घडलेल्या चुकीमुळे भारताला गोल करण्याची संधी मिळाली. हरमनप्रीत सिंगने गोल साकारण्याची संधी वाया घालवली नाही.

भारताने चार विजय आणि एका पराभवासह १२ गुण मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. तसेच गेट्र ब्रिटनचा संघ स्पध्रेत अपराजित राहिला असून, त्यांनी तीन विजय मिळवले आहेत, तर दोन सामने बरोबरीत सोडवले आहेत.