मलेशियात सुरु असलेल्या सुलतान जोहर चषकात भारतीय युवा हॉकी संघाने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला आहे. ५-४ च्या फरकाने सामना जिंकत भारताने उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं आहे. या विजयासह भारताने गटात आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. भारताचा पुढचा सामना १२ ऑक्टोबररोजी इंग्लंडच्या संघाविरुद्ध होणार आहे.

पहिल्याच सत्रात भारतीय खेळाडूंनी आक्रमक सुरुवात करत ऑस्ट्रेलियावर दबाव आणला. ५ व्या मिनीटाला गुरसाहिबजीत सिंहने सुरेख मैदानी गोल करत भारताचं खातं उघडलं. यानंतर पहिल्याच सत्रात भारतीयांनी गोल करण्याचा सपाटा लावत ११ व्या, १४ व्या आणि १५ व्या मिनीटाला गोल करत ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुरतं बॅकफूटला ढकललं. पहिल्या सत्राच्या अखेरीस भारताने ४-० अशी मोठी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात मात्र भारताचा बचाव थोडा दुबळा पडला. १८ व्या मिनीटाला ऑस्ट्रेलियाच्या डेमॉन स्टेफन्सने पेनल्टी स्ट्रोकवर संघाचं खातं उघडलं. यानंतर ३५ व्या मिनीटालाही स्टेफन्सने ऑस्ट्रेलियाकडून गोल झळकावत भारताची आघाडी ४-२ ने कमी केली. यानंतर भारताकडून शैलेंद्र लाक्राने ४३ व्या मिनीटाला गोल करत भारताला ५-३ अशी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या क्षणात ऑस्ट्रेलियाने सामन्यात बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना ४ गोलवरचं समाधान मानावं लागलं.