जोहोर बाहरू (मलेशिया) : भारताच्या पुरुष संघाने ऑस्ट्रेलियाचा ५-१ असा धुव्वा उडवत सुलतान ऑफ जोहोर चषक कनिष्ठ गटाच्या हॉकी स्पर्धेची बुधवारी अंतिम फेरी गाठली.

तमन दया हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताच्या वर्चस्वपूर्ण कामगिरीत शिलानंद लाक्रा (२६व्या आणि २९व्या मिनिटाला), दिलप्रीत सिंग (४४व्या मि.), गुरुसाहिबजित सिंग (४८व्या मि.) आणि मनदीप मोर (५०व्या मि.) यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

ऑस्ट्रेलियाच्या बचावपटूंच्या चुकीमुळे भारताला पहिल्याच मिनिटाला गोल करण्याची संधी मिळाली होती. गुरुसाहिबजितने त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न कले. परंतु रॉबर्ट मॅकलीनानने हा प्रयत्न हाणून पाडला. मग पहिल्या सत्रातील उर्वरित वेळेत दोन्ही संघांनी चेंडूवरील वर्चस्वावर भर दिला. आठव्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला.

दुसऱ्या सत्रात प्रशांत चव्हाणने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत जोरदार मुसंडी मारली. मग एकाच मिनिटाने भारताला सामन्यातील पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. लाक्राने भारताचे खाते उघडण्याची किमया साधली. मग तीनच मिनिटाने त्याने आणखी एक गोल करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या सत्रात दिलप्रीतने आणखी एका गोलची भर पाडली. लाक्रा, सुदीप चिरमाको आणि उत्तम सिंग यांनी ऑस्ट्रेलियाचा बदली गोलरक्षक ख्रिस्टियन स्टार्कीवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला.

राऊंड रॉबिन लीग पद्धतीने चाललेल्या या स्पर्धेच्या साखळी सामन्यांमध्ये शुक्रवारी भारताचा अखेरचा सामना गेट्र ब्रिटनशी होणार आहे.