आयसीसी करंडक मालिकेतील भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना भारताने पाच धावांनी जिंकत पुन्हा एकदा आपणच चॅम्पियन्स असल्याचे सिध्द केले. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यामध्ये पहिली फलंदाजी करणा-या भारताने २० षटकांत १२९ धावा करत इंग्लंड समोर १३० धावांचे आव्हान दिले होते. इंग्लंडचा डाव २० षटकांत १२४ धावांमध्ये आटोपला. इंग्लंडने १२४ धावांच्या बदल्यात आपले ८ गडी गमावले.
सामन्यात पावसामुळे दोनवेळा व्यत्यय आला होता. पाऊस थांबल्याबर २० षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. इंग्लंड संघाचा कर्णधार अॅलिस्टर कुक याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
भारताचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने ४३ व मालिकेतील सर्वाधिक धावा करणा-या शिखर धवनने दमदार ३१ धावा केल्या. मात्र, इंग्लंडच्या शिस्तबध्द गोलंदाजी पुढे भारताला जरा जपूनच खेळावे लागले. स्टुअर्ट ब्रॉडने रोहित शर्माचा त्रिफळा उडवत त्याला स्वस्तामध्ये बाद केले. त्याला अवघ्या ९ धावा करता आल्या. शिखर धवनने कसलेल्या फलांदाजाप्रमाणे फलंदाजीला सुरूवात केली. धवन ३१ धावांवर खेळत असताना रवी बोपाराला सरळ फटका मारण्याच्या नादामध्ये ट्रेडवेलच्या हातामध्ये झेल देत बाद झाला.
बोपाराने सुरेश रैना आणि धोनीला एका षटकामध्ये बाद करत भारताला मोठा धक्का दिला होता. मात्र, पुढील तीन षटकांमध्ये रविंद्र जडेजा व कोहलीने ३० धावा करत भारताला १२९ पर्यंत मजल मारण्यात यश मिळवून दिले. बोपाराने २० धावा देत ३ बळी मिळविले.
जडेजाने शेवटच्या षटकात टीम ब्रेसन च्या चेंडूवर षटकार ठोकत नाबाद ३३ धावा केल्या. इंग्लंडचा डाव सुरूवातीलाच डळमळला  कर्णधार अॅलिस्टर कुक दोन धावांत गारद झाला. उमेश यादवला झेल देऊन तो तंबूत परतला. जोनाथन ट्रॉटने १७ चेंडूमध्ये २० धावांची खेळी केली.
मॉर्गन आणि बोपाराने पाचव्या विकेटसाठी ६४ धावांची खेळी करत विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. गोलंदाजीत काहीसा महागडा ठरलेल्या इशांत शर्माने मॉर्गन आणि बोपाराची जोडी फोडली. इशांतने चार षटकांमध्ये ३६ धावा दिल्या.  मात्र, लागोपाठ  ईऑन मॉरगन आणि रवी बोपारा हे इंग्लंडचे महत्वाचे दोन मोहरे टीपत इशांतने सामन्याचे चित्र बदलले.
अश्विनने चार षटकांमध्ये १५ धावा देत दोन बळी मिळविले. इंग्लंडला अंतिम षटकात १५ धावा व शेवटच्या चेंडूवर सहा धावांची आवश्यकता होती. इंग्लंडचा फलंदाज ट्रेडवेल याला चकवत अंतिम षटक टाकणा-या अश्र्विनने शेवटचा चेंडू निर्धाव टाकला.
मालिकावीर शिखर धवनने त्याला मिळालेल्या ‘सोनेरी बॅट’सह मिळालेली पुरस्काराची रक्कम उत्तराखंड पुरग्रस्तांच्या मदतनिधीला देण्याचे जाहीर केले.

प्रतिस्पर्धी संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), आर. अश्विन, शिखर धवन, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, अमित मिश्रा, इरफान पठाण, सुरेश रैना, इशांत शर्मा, रोहित शर्मा, मुरली विजय, विनय कुमार आणि उमेश यादव.

इंग्लंड: अॅलिस्टर कुक (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, स्टीवन फिन, जो रुट, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स, जेम्स अँडरसन, इयान बेल, टिम ब्रेसनन, जोस बटलर, ईऑन मॉरगन, ग्रॅमी स्वान, जोनाथन ट्रॉट