भारताच्या पुरुष हॉकी संघाने जपानवर ४-२ असा विजय मिळवून चार देशांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंड (३-२) आणि बेल्जियम (५-४) या बलाढय़ संघांना नमवून मनोबल उंचावलेल्या भारतीय संघाने जपानला सहज धूळ चारली.

जेतेपदाच्या लढतीत भारतासमोर बेल्जियमचे आव्हान असणार आहे. त्यांनी यजमान न्यूझीलंडवर ४-० अशी सहज मात केली. मनदीप सिंग आणि रमणदीप सिंग यांनी अखेरच्या दोन मिनिटांत गोल करत भारताचा विजय निश्चित केला. भारतासाठी विवेक प्रसाद आणि वरुण कुमार यांनी प्रत्येकी एक गोल केला. जपानकडून सेरेन तनका आणि शोटा यमाडा यांना गोल करता आला.

भारताने पहिल्या सत्रात अधिक काळ चेंडूवर ताबा मिळवत सुरेख पासेस केले. हरजित सिंग मधल्या फळीत उत्तम खेळ करताना आघाडीपटू अरमान कुरेशीकडे चेंडू पास केला. कुरेशीने तो विवेककडे टोलवला आणि भारताने १२व्या मिनिटाला आघाडी घेतली. मात्र, दोन मिनिटांतच जपानने बरोबरी केली. जपानच्या तनकाने हा गोल केला. तरीही दुसऱ्या सत्रात भारताने जपानला झुंजवले. ३०व्या मिनिटाला वरुणने भारतासाठी दुसरा गोल केला. त्यालाही जपानकडून त्वरित प्रत्युत्तर मिळाले. यमाडाने ४३व्या मिनिटाला गोल करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. त्यानंतर अखेरच्या १७ मिनिटांचा खेळ चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी विजय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, यश भारताच्या पारडय़ात पडले. मनदीप व रमणदीप यांनी ५८व्या मिनिटाला सलग गोल करत भारताचा विजय निश्चित केला.