भारतीय संघाचा भरवशाचा ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंह आणि नवोदीत विवेक प्रसादच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताने चौरंगी हॉकी मालिकेत आपला पहिला विजय नोंदवला आहे. न्यूझीलंड येथे खेळवण्यात येणाऱ्या या मालिकेत भारताने जपानवर ६-० च्या फरकाने मात केली. या सामन्यात रुपिंदरपाल सिंह (७ वे मिनीट), विवेक प्रसाद (१२ आणि २८ वे मिनीट), दिलप्रीत सिंह (३५ आणि ४५ वे मिनीट), हरमनप्रीत सिंह (४१ ने मिनीट) यांनी गोल झळकावले.

अपेक्षेप्रमाणे भारताने या सामन्यात आक्रमकपणे सुरुवात केली. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दिलेले पास, चेंडूवरचं नियंत्रण आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात प्रवेश करण्याचं तंत्र या सर्व बाबी अव्वल दर्जाच्या होत्या. सामन्यात ७ व्या मिनीटाला भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, या संधीचा फायदा घेण्यासाठी हरमनप्रीत पुढे सरसावला. मात्र हरमनप्रीतचा फटका चुकीच्या पद्धतीने अडवल्यामुळे भारताला पेनल्टी स्ट्रेक बहाल करण्यात आला. यावेळी अनुभवी रुपिंदपाल सिंहने मिळालेल्या संधीचं सोनं करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

यानंतर नवोदित विवेक प्रसाद, दलप्रीत सिंह यांनी आश्वासक खेळ करुन भारताची आघाडी सामन्यात आणखी वाढवली. या सामन्यात जपानी खेळाडूंचा भारतीय खेळाडूंच्या झंजावातापुढे निभावच लागला नाही. जपानी खेळाडूंना सामन्यात पेनल्टी कॉर्नवर गोल करण्याची संधी मिळाली, मात्र या संधीचा त्यांना फायदा उचलता आला नाही. याचसोबत भारतीय बचावपटूंनी अखेरच्या सत्रापर्यंत भक्कम बचाव करत जपानी खेळाडूंना गोल करण्याची संधीच दिली नाही. या मालिकेत भारताचा पुढचा सामना १८ जानेवारी रोजी बेल्जियमविरुद्ध होणार आहे.