सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नामिबियावर १९७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत आगेकूच केली आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऋषभ पंतने १४ चौकार आणि २ षटकारांसह १११ धावांची दिमाखदार खेळी साकारली. कर्णधार इशान किशन झटपट बाद झाल्यानंतरही ऋषभने सूत्रधाराची भूमिका निभावत मोठय़ा धावसंख्येचा पाया रचला.
सर्फराझ खानने ६ चौकार आणि एका षटकारासह ७६ तर अरमान जाफरने ४ चौकार आणि एका षटकारासह ४१ धावा करत ऋषभला चांगली साथ दिली. महिपाल लोमरुरने २१ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह ४१ धावांची उपयुक्त खेळी केली. भारतीय संघाने ३४९ धावांचा डोंगर उभारला. नामिबियातर्फे फ्रिट्स कोइट्झने ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नामिबियाचा डाव १५२ धावांतच आटोपला.

संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ६ बाद ३४९ (ऋषभ पंत १११, सर्फराझ खान ७६, अरमान जाफर ६४, फ्रिट्झ कोइट्झी ३/ ७८) विजयी विरुद्ध नामिबिया : ३९ षटकांत सर्व बाद १५२ (निको डाव्हिन ३३, मयांक डागर ३/२५, अनमोलप्रीत सिंग ३/२७)

सामनावीर : ऋषभ पंत.