ऋषभ पंतची २४ चेंडूंत ७८ धावांची वेगवान खेळी; नेपाळवर विजयासह गटात अव्वल स्थान
ऋषभ पंतच्या अफलातून फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नेपाळवर ७ विकेट्सनी मात केली. या विजयासह भारतीय संघाने विजयी हॅट्ट्रिक नोंदवत गटात अव्वल स्थान राखले. उपांत्यपूर्व फेरीत भारताची लढत बांगलादेश किंवा नामिबिया यांच्याशी होणार आहे.
प्राथमिक फेरीत न्यूझीलंडसारख्या मातबर संघाला नेपाळने पराभवाचा धक्का दिला होता. मात्र भारतीय संघाने खणखणीत खेळाच्या जोरावर नेपाळला निष्प्रभ ठरवले. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि त्यांनी केवळ १६९ धावांची मजल मारली. संदीप सुनारने ३७ तर रजबीर सिंगने ३५ धावांची खेळी केली. भारतातर्फे अवेश खानने ३४ धावांत ३ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऋषभ पंत आणि इशान किशन यांनी १२४ धावांची दणदणीत सलामी दिली. ऋषभने २४ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह ७८ धावा फटकावल्या. ऋषभच्या खेळीनेच भारताच्या विजयाचा पाया रचला. काही दिवसांतच होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या लिलावाच्या पाश्र्वभूमीवर ऋषभने केलेली खेळी फ्रँचाइजींचे लक्ष वेधून घेणारी आहे. त्याने अवघ्या १८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. इशानने ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५२ धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर पुढच्या फलंदाजांनी उपयुक्त खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
दरम्यान अन्य लढतींमध्ये नामिबियाने दक्षिण आफ्रिकेवर मात करत खळबळजनक विजयाची नोंद केली.

संक्षिप्त धावफलक
नेपाळ १९ वर्षांखालील संघ : ४८ षटकांत ८ बाद १६९ (संदीप सुनार ३७, रजबीर सिंग ३५, अवेश खान ३/३४) पराभूत विरुद्ध भारत १९ वर्षांखालील संघ : १८.१ षटकांत ३ बाद १७५ (ऋषभ पंत ७८, इशान किशन ५२, प्रेम तमांग २/४१)

सामनावीर : ऋषभ पंत.