News Flash

भारताला कांस्यपदक

गतविजेत्या नेदरलँड्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवले

| December 7, 2015 01:10 am

अ‍ॅमस्टरडॅमला १९८२मध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पध्रेत भारताने पाकिस्तानचा ५-४ असा पराभव करून पदक जिंकले होते.

गतविजेत्या नेदरलँड्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवले
आघाडी.. पिछाडी.. बरोबरी.. अशा क्षणाक्षणाला उत्कंठा ताणून धरणाऱ्या सामन्यात यजमान भारताने गतविजेत्या नेदरलँड्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ असा पराभव करून जागतिक हॉकी लीगच्या अंतिम टप्प्यात कांस्यपदकावर मोहर उमटवली. त्याुमळे महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक मिळवण्याची ३३ वर्षांची भारताची प्रतीक्षा संपुष्टात आली. हा सामना निर्धारित वेळेत ५-५ असा बरोबरीत सुटला. त्यानंतर हाच थरार पेनल्टी शूटआऊटमध्येही पाहायला मिळाला, मात्र या वेळी भारतीय खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा फायदा घेत बाजी मारली.
अ‍ॅमस्टरडॅमला १९८२मध्ये झालेल्या चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पध्रेत भारताने पाकिस्तानचा ५-४ असा पराभव करून पदक जिंकले होते. रविवारी तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत भारताने पिछाडीवरून मुसंडी मारताना नेदरलँड्सला कडवी टक्कर दिली. सुरुवातीला संथ खेळ करणाऱ्या भारताने हळूहळू आक्रमक खेळ करीत नेदरलँड्सला तोडीस तोड उत्तर दिले. नवव्या मिनिटाला मायक्रो प्रुइज्सेरने गोल करून नेदरलँडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात निएक व्ॉन डेर स्कूटने गोल करीत ही आघाडी दुप्पट केली. मध्यंतरापर्यंत २-० अशा आघाडीवरील नेदरलँड्सचा खेळ पाहून यजमानांनी दुसऱ्या सत्रात आक्रमक खेळ केला. ३९व्या मिनिटाला रमनदीपने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत १-२ पिछाडी कमी केली. ४७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदर पाल सिंगने गोल करून सामन्यात २-२ साधली.
त्यानंतर रमनदीपच्या (५१ मि.) गोलवर भारताने ३-२ अशी आघाडी घेतली़, परंतु त्याला मिंक व्ॉन डेर विर्डेनने (५४ मि.) प्रत्युत्तर देत पुन्हा बरोबरी साधली. सामन्याचे पारडे कधी भारताच्या तर कधी नेदरलँडच्या बाजूने झुकत होते. पुढील दोन मिनिटांत रुपिंदर पाल (५५ मि.) व आकाशदीप सिंग (५६ मि.) यांनी गोलधडाका लावून भारताला ५-३ असे आघाडीवर आणले. मग मिंक वॉन डेर विर्डेनने ५८ व्या व ६० व्या मिनिटाला गोल करीत हॅट्ट्रिकसह सामना ५-५ असा बरोबरीत सोडवला.

ऑस्ट्रेलियाला विजेतेपद
ऑस्ट्रेलियाने २-१ अशा फरकाने बेल्जियमवर विजय मिळवत जेतेपद पटकावले. १६व्या मिनिटाला हेयवर्ड जेरेमीने ऑस्ट्रेलियासाठी पहिला गोल केला. मग ३७व्या मिनिटाला डॉसन मॅथ्यूने भर घातली. बेल्जियमकडून ६०व्या मिनिटाला सिमॉन गॉगनार्डने एकमेव गोल केला.

आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आम्हीही कडवे आव्हान उभे करू शकतो, हे आजच्या विजयाने सिद्ध केले. संघासाठी हे पदक आत्मविश्वास वाढवणारे आहे. या स्पध्रेत आम्हाला सातत्यपूर्ण खेळ करण्यात अपयश आले; परंतु कांस्यपदकाच्या लढतीत संघ संपूर्ण ताकदीने मैदानावर उतरला होता. आमच्याकडून झालेल्या काही चुकांचा फटका संघाला बसला असता, परंतु गोलरक्षक पी. आर. श्रीजेश आणि कर्णधार सरदार सिंग यांच्यामुळे आम्ही जिंकलो.
– रोलँट ऑल्टमन्स, भारताचे मुख्य प्रशिक्षक

scoreboard

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 1:03 am

Web Title: india beat netherlands in world hockey league
टॅग : World Hockey League
Next Stories
1 श्रीकांतची कडवी झुंज अपयशी
2 आज सायना, श्रीकांतसह अव्वल बॅडमिंटनपटूंचा लिलाव
3 आनंद-अ‍ॅरोनियन यांच्यात बरोबरी
Just Now!
X