मस्कत येथे सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात यजमान ओमानचा ११-० ने धुव्वा उडवल्यानंतर भारताने दुसऱ्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३-१ ने पराभव केला.

सामन्याच्या सुरुवातीच्याच मिनीटामध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद इरफान (ज्युनिअर)ने मैदानी गोल करत पाकिस्तानला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पाकच्या या गोलमुळे बॅकफूटवर गेलेला भारताचा संघ पहिल्या सत्रात फारशी चमकदार कामगिरी करु शकला नाही. मात्र दुसऱ्या सत्रापासून भारताने आक्रमक खेळ करत दमदार पुनरागमन केलं. कर्णधार मनप्रीत सिंहने २४ व्या मिनीटाला गोल करत भारताला १-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर लागोपाठ ३३ व्या मिनीटाला मनदीपने मैदानी गोल करत भारताची आघाडी २-१ ने वाढवली.

तिसऱ्या सत्रात ४२ व्या मिनीटाला दिलप्रीत सिंहने आणखी एक गोल करत पाकिस्तानला सामन्यात बॅकफूटवर ढकललं. यानंतर पाकिस्तानचा संघ सामन्यात पुनरागमन करु शकला नाही. भारताचा या स्पर्धेत पुढचा सामना रविवारी जपानविरुद्ध रंगणार आहे.