पाकिस्तानवर सात विकेट्स राखून विजय

आयसीसी महिला विश्वचषक पात्रता क्रिकेट स्पध्रेत भारतीय महिलांसमोर अखेरच्या साखळी सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान होते. शेजारील राष्ट्राशी असेलेले तणावपूर्ण संबंध पाहता या लढतीत दोन्ही संघांवर प्रचंड दडपण होते. मात्र मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने हे दडपण झुगारून पाकिस्तानचा सहज धुव्वा उडवला. एकता बिस्टच्या (५/८) अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानचा संघ ६७ धावांत गडगडला आणि भारताने हे माफक लक्ष्य २२.३ षटकांत ३ फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. या विजयासह भारताने अंतिम फेरीत धडक मारली असून जेतेपदासाठी त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे.

या स्पध्रेत आतापर्यंत अपराजित राहणारा भारत हा एकमेव संघ आहे. दुसरीकडे मार्च २०१४नंतर प्रथमच शंभर धावांच्या आत गारद झालेल्या पाकिस्तानने पराभवानंतरही इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेत प्रवेश निश्चित केला. रविवारचा दिवस गाजवणाऱ्या एकताने १० षटकांत ७ निर्धाव षटके टाकून ८ धावा दिल्या आणि पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत धाडला. वेदा कृष्णमूर्तीने पहिल्या स्लीपमध्ये दोन अप्रतिम झेल टिपून एकताच्या गोलंदाजीला यश मिळवून दिले. तत्पूर्वी, शिखा पांडेने पाकिस्तानच्या नाहिदा खान व जवेरीया खान यांना बाद करून भारताची बाजू भक्कम केली. पाकिस्तानच्या ६७ धावांचा पाठलाग करताना भारताच्या दीप्ती शर्मा आणि हरमनप्रित कौर यांनी संयमी खेळ करत ४२ धावांची भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान : ४३.४ षटकांत ६७ (आयेशा जाफर १९; एकता बिस्ट ५/८, शिखा पांडे २/९) पराभूत वि. भारत : २२.३ षटकांत ३ बाद ७० (दीप्ती शर्मा नाबाद २९, हरमनप्रित कौर २४; सादीया युसूफ २/१९).