भारताचा ५ विकेट्सनी विजय; पाकिस्तानचा डाव ८३ धावांत संपुष्टात; विराट कोहलीची संयमी खेळी

थरार, रोमांच, उत्कंठा, जल्लोष या साऱ्या विशेषणांना जागणाऱ्या आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान पारंपरिक द्वंद्वात भारतीय संघाने बाजी मारली. खेळपट्टीचा नूर आणि वातावरणाचा अंदाज जोखण्यात माहीर ‘माही’ अर्थात महेंद्रसिंग धोनीने हिरव्यागार खेळपट्टीवर गोलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत भारतीय गोलंदाजांनी केलेला भेदक मारा आणि फलंदाजांनी केलेल्या बाळबोध चुका यामुळे पाकिस्तानचा ८३ धावांत खुर्दा उडाला. फिक्सिंगप्रकरणी बंदीची शिक्षा पूर्ण केलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद आमीरने भारताची अवस्था ३ बाद ८ अशी केली. विलक्षण पुनरागमनसाठी प्रसिद्ध पाकिस्तान केवळ ८३ धावांचे पाठबळ असतानाही चमत्कार घडवणार अशी स्थिती असताना विराट कोहलीने संयमी खेळीसह भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तब्बल पाच वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद आमीरने दुसऱ्याच अफलातून चेंडूवर रोहित शर्माला पायचीत केले. शिखर धवनऐवजी संधी मिळालेल्या अजिंक्य रहाणेला पायचीत करत आमीरने दमदार सुरुवात केली. मोहम्मद सामीच्या षटकात कोहली आणि रैनाने पडझड होऊ दिली नाही. मात्र पुढच्याच षटकात आमीरने भारताला पुन्हा दणका दिला. आमीरचा चेंडू खेळण्याचा सुरेश रैनाचा प्रयत्न फसला आणि वहाब रियाझने त्याचा झेल पकडला. ८३ धावांच्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था ३ बाद ८ अशी झाली. पाकिस्तानचे गोलंदाज विरुद्ध भारतीय फलंदाज या मुकाबल्यात पाकिस्तानचे गोलंदाज सरशी साधणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र विराट कोहलीने संयमी खेळाचे प्रदर्शन करताना आमीरची चार षटके खेळून काढली. आमीर, वहाब आणि इरफान तिन्ही आघाडय़ांवर हल्लाबोल करत असताना कोहलीने एकेरी धावा आणि चौकार यांची सुरेख सांगड घातली. अनुभवी युवराज सिंग एकेक धावेसाठी झगडत असताना कोहलीने मात्र ५१ चेंडूत ४९ धावांची खेळी करत हिरव्यागार खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी याचा वस्तुपाठ सादर केला. कोहली बाद झाल्यानंतर धोनीने चौकारासह विजयाची औपचारिकता पूर्ण केली. युवराजने ३२ चेंडूत १४ धावा केल्या. पाकिस्तानतर्फे आमीरने १८ धावांत ३ बळी घेतले. कोहलीलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

तत्पूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा वस्तुपाठ सादर करणाऱ्या आशीष नेहराने पहिल्याच षटकात मोहम्मद हफीझला महेंद्रसिंग धोनीकडे झेल देण्यास भाग पाडले. शर्जील खान आणि खुर्रम मंझूर यांनी चौकारांची पोतडी उघडली. मात्र बुमराहचा चेंडू टोलवण्याचा शर्जीलचा प्रयत्न रहाणेच्या हाती विसावला. चोरटी धाव घेण्याचा खुर्रमचा प्रयत्न विराट कोहलीच्या अफलातून ‘थ्रो’मुळे संपुष्टात आला. भारताविरुद्ध हमखास मोठी खेळी साकारणाऱ्या शोएब मलिककडून पाकिस्तानला मोठय़ा अपेक्षा होत्या. परंतु पंडय़ाने त्याला ४ धावांवरच बाद केले.  उमर अकमलला युवराजने पायचीत करत पाकिस्तानच्या धावगतीला वेसण घातली. सर्वच प्रमुख खेळाडू नियमित अंतरात बाद झाल्याने पाकिस्तानच्या चाहत्यांकरता शाहिद आफ्रिदी हे एकमेव आशास्थान होते. मात्र एकेरी धावेऐवजी दुहेरी धावेचा अट्टहास आफ्रिदीच्या अंगलट आला. रवींद्र जडेजाच्या अचूक ‘थ्रो’मुळे आफ्रिदीरूपी वादळ थंडावले.   सामन्यावर मिळालेली घट्ट पकड सैलावू द्यायची नाही असा पण केलेल्या भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांनाही स्थिरावू दिले नाही. रवींद्र जडेजाने वहाब रियाझला पायचीत केले. पंडय़ाने एकाच षटकात मोहम्मद आमीर आणि मोहम्मद इरफान यांना माघारी धाडले आणि पाकिस्तानचा डाव ८३ धावांतच आटोपला. भारतातर्फे पंडय़ाने ८ धावांत ३ बळी घेतले.

०३ : भारताविरुद्ध शनिवारी ट्वेन्टी-२० प्रकारातील प्रतिस्पर्धी संघाची ही तिसरी नीचांकी धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने २०१२मध्ये इंग्लंडचा डाव १४.४ षटकांत ८० धावांवर, तर २०१५ मध्ये श्रीलंकेचा डाव १८ षटकांत ८२ धावांवर गुंडाळला होता.

धावफलक

पाकिस्तान : मोहम्मद हफीझ झे. धोनी गो. नेहरा ४, शर्जील खान झे. रहाणे गो. बुमराह ७, खुर्रम मंझूर धावचीत १०, शोएब मलिक झे. धोनी गो. पंडय़ा ४, उमर अकमल पायचीत गो. युवराज ३, सर्फराझ अहमद त्रि.गो. जडेजा २५, शाहिद आफ्रिदी धावचीत २, वहाब रियाझ पायचीत गो. जडेजा ४, मोहम्मद सामी झे. रैना गो. पंडय़ा ८, मोहम्मद आमीर त्रि.गो. पंडय़ा १, मोहम्मद इरफान नाबाद ०; अवांतर (लेगबाइज ४, वाइड ११) १५; एकूण : १७.३ षटकांत  ८३.

गोलंदाजी : आशीष नेहरा ३-०-२०-१, जसप्रीत बुमराह ३-२-८-१, हार्दिक पंडय़ा ३.३-०-८-३, युवराज सिंग २-०-११-१, रवींद्र जडेजा ३-०-११-२, रवीचंद्रन अश्विन ३-०-२१-०

भारत : रोहित शर्मा पायचीत गो. आमीर ०, अजिंक्य रहाणे पायचीत  गो. आमीर ०, विराट कोहली पायचीत गो. सामी ४९, सुरेश रैना झे. वहाब गो. मोहम्मद आमीर १, युवराज सिंग नाबाद १४, हार्दिक पंडय़ा झे. हफीझ गो. सामी ०, महेंद्रसिंग धोनी नाबाद ७; अवांतर (बाइज १, लेगबाइज ३, वाइड ८, नोबॉल २) १४; एकूण : १५.३ षटकांत ५ बाद ८५

गोलंदाजी : मोहम्मद आमीर ४-०-१८-३, मोहम्मद सामी ४-०-१६-२, मोहम्मद इरफान ४-०-१६-०, वहाब रियाझ ३.३-०-३१-०

सामनावीर : विराट कोहली

या खेळपट्टीवर फलंदाजी करणे खरंच कठीण होते. बांगलादेशविरूद्धच्या लढतीत आततायीपणे फटका मारताना मी बाद झालो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चुकांतून शिकणे आवश्यक ठरते. मी योग्यवेळी फटक्यांमध्ये बदल केला. खेळपट्टी आणि परिस्थितीचा आदर करणे नितांत गरजेचे होते. मोहम्मद आमिरचा भन्नाट स्पेल मी खेळू शकलो याचे समाधान आहे. तो जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे.

– विराट कोहली, सामनावीर