शिवम आनंद, दलप्रीत सिंग, नीलम संजीप सेसेचा गोल

भारतीय युवा हॉकी संघाने ढाका येथे सुरू असलेल्या १८ वर्षांखालील आशिया चषक हॉकी स्पध्रेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-१ असे नमवून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. शिवम आनंद, दलप्रीत सिंग व नीलम संजीप सेसे यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताला विजय मिळवून दिला. अंतिम फेरीत भारतासमोर यजमान बांगलादेशचे आव्हान आहे.

सामन्याच्या सातव्या मिनिटाला शिवमने भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सातत्याने आक्रमण करत भारताने प्रतिस्पर्धीची बचावफळी खिळखिळी केली. ३२व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दलप्रीतने गोल करून पहिल्या सत्रात भारताला २-० असे आघाडीवर ठेवले. मध्यंतरानंतरही भारतीय खेळाडूंनी चेंडूवर ताबा कायम ठेवला. लगेचच भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला, परंतु या वेळी त्याचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले.

४६व्या मिनिटाला नीलमने पेनल्टी कॉर्नरवरच गोल करून भारताची आघाडी ३-० अशी भक्कम केली. ६३व्या मिनिटाला पाकिस्तानसाठी अमजद अली खानने गोल केला, परंतु पराभव टाळण्यासाठी हा प्रयत्न पुरेसा नव्हता.

 

जयराम उपांत्यपूर्व फेरीत

सेऊल : भारताच्या अजय जयरामने कोरिया खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीत त्याने चीनच्या हुआंग युक्सियँगचा २१-१५, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत २७व्या स्थानावर असलेल्या जयरामला पुढील फेरीत कोरियाच्या ली ह्यून याचा सामना करावा लागेल. दुसऱ्या सामन्यात बी. साई प्रणितला सहाव्या मानांकित कोरियाच्या होकडून ९-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. ‘अगदी सहज हा विजय मिळवला, परंतु दुसऱ्या गेममध्ये चुरशीचा सामना झाला. ली ह्यु याच्याविरुद्ध खेळणे आव्हानात्मक आहे. मात्र, त्याच्याविरुद्ध चांगला खेळ करण्यासाठी आणि सातत्यपूर्ण कामगिरीची माझा प्रयत्न असेल,’ असे जयराम म्हणाला.