News Flash

अश्विनचा सात-बारा

दक्षिण आफ्रिकेने तब्बल नऊ वष्रे परदेशांतील १५ कसोटी मालिकांमध्ये पराभूत न होण्याचा रुबाब टिकवला होता.

आर. अश्विन

२९.५-७-६६-७  सामन्यात ९८ धावांत १२ बळी
* नागपूरच्या तिसऱ्या कसोटीसह भारताचे मालिकेवर वर्चस्व
* तब्बल नऊ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने विदेशात मालिका गमावली
दक्षिण आफ्रिकेने तब्बल नऊ वष्रे परदेशांतील १५ कसोटी मालिकांमध्ये पराभूत न होण्याचा रुबाब टिकवला होता. मात्र तो मातीमोल ठरण्यास फिरकीच्या नंदनवनातील म्हणजे भारतातील फक्त सात दिवस पुरेसे ठरले. जागतिक क्रिकेटमध्ये अव्वल स्थान दिमाखात भूषवणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात मात्र ओशाळला. रविचंद्रन अश्विनच्या जादूई फिरकीची नजाकत जामठाच्या व्हीसीए स्टेडियमवर तिसऱ्या दिवशी पाहायला मिळाली. त्यामुळेच पहिल्या कसोटीप्रमाणे तिसरी कसोटी भारताने फिरकी चक्रव्यूह रचून फक्त अडीच दिवसांत निकाली ठरवली. याशिवाय चार कसोटी सामन्यांच्या मालिकेवर २-० असे प्रभुत्व मिळवले.
व्हीसीएच्या खेळपट्टीवर तिसऱ्या दिवशी चेंडू अधिकच वळू लागला. मात्र चहापानानंतर फक्त ५२ मिनिटांत दक्षिण आफ्रिकेने पांढरे निशाण फडकावले. आफ्रिकेचा दुसरा डाव ८९.५ षटकांत १८५ धावांत आटोपला आणि भारताने तिसरी कसोटी १२४ धावांनी जिंकली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथमच मायदेशात कसोटी मालिका जिंकण्याची किमया साधली. दक्षिण आफ्रिकेला कसोटी वाचवण्यासाठी ३१० धावांचे लक्ष्य पेलायचे होते. मात्र भारतीय फिरकीपुढे त्यांचा निभाव लागला नाही.
२९ वर्षीय अश्विनने भारताच्या फिरकीचे नेतृत्व करताना ३१ कसोटी सामन्यांत चौथ्यांदा दहा बळी घेण्याचा पराक्रम दाखवला. आफ्रिकेच्या फलंदाजांवर अंकुश ठेवताना अश्विनने दुसऱ्या डावात ६६ धावांत ७ बळी घेतले, तर सामन्यात ९८ धावांत १२ बळी घेऊन सामनावीर पुरस्कार पटकावला. अश्विनने दुसऱ्या डावात दोन सलामीवीर डीन एल्गर, स्टियान व्हान झिल आणि जीन-पॉल डय़ुमिनी अशा तीन डावखुऱ्या फलंदाजांसह ए बी डी’व्हिलियर्सचा सर्वात मौल्यवान बळी मिळवला. आफ्रिकेचा अखेरचा फलंदाज मॉर्नी मॉर्केलचा अश्विनने त्रिफळा भेदल्यानंतर भारतीय संघाने मैदानावर विजयाचा जल्लोष साजरा केला. अश्विनचा अखेरचा स्पेल अत्यंत लाजवाब होता. त्याने १९ चेंडूंत १६ धावांत ४ बळी घेतले.
लेग-स्पिनर अमित मिश्राने दुसऱ्या डावात ५१ धावांत ३ बळी घेत त्याला छान साथ दिली. दुसऱ्या सत्रात फॅफ डू प्लेसिस (३९) आणि हशिम अमला (३९) यांची जोडी चांगलीच जमली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. ही जोडी भारताच्या विजयाचे पराभवात रूपांतर करणार का, अशी चिन्हे दिसू लागली. मात्र मिश्राने ही जोडी फोडून महत्त्वाची भूमिका बजावली. मग मिश्रानेच डू प्लेसिसचा त्रिफळा उडवला. त्यानंतर अश्विनने आफ्रिकेचे शेपूट गुंडाळले.
बंगळुरूची दुसरी कसोटी पावसामुळे वाया गेली, मात्र तरीही मोहाली आणि नागपूर कसोटी जिंकून मालिकेवर वर्चस्व मिळवणारा भारतीय संघ ३ डिसेंबरपासून फिरोझशाह कोटला स्टेडियमवर चौथी आणि अखेरची कसोटी खेळणार आहे.

धावफलक
भारत (पहिला डाव) : २१५
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : ७९
भारत (दुसरा डाव) : १७३
दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : डीन एल्गर पायचीत गो. अश्विन १८, स्टियान व्हान झिल झे. रोहित गो. अश्विन ५, इम्रान ताहीर पायचीत गो. मिश्रा ८, हशिम अमला झे. कोहली गो. मिश्रा ३९, ए बी डी’व्हिलियर्स पायचीत गो. अश्विन ९, फॅफ डू प्लेसिस त्रि. गो. मिश्रा ३९, जीन-पॉल डय़ुमिनी पायचीत गो. अश्विन १९, डेन व्हिलास झे. साहा गो. अश्विन १२, सिमॉन हार्मर नाबाद ८, कॅगिसो रबाडा झे. कोहली गो. अश्विन ६, मॉर्नी मॉर्केल त्रि. गो. अश्विन ४, अवांतर (बाइज ९, लेगबाइज ५, नोबॉल ४) १८, एकूण ८९.५ षटकांत सर्व बाद १८५
बाद क्रम : १-१७, २-२९, ३-४०, ४-५८, ५-१३०, ६-१३५, ७-१६४, ८-१६७, ९-१७७, १०-१८५
गोलंदाजी : इशांत शर्मा १५-६-२०-०, आर. अश्विन २९.५-७-६६-७, रवींद्र जडेजा २५-१२-३४-०, अमित मिश्रा २०-२-५१-३
सामनावीर : रविचंद्रन अश्विन.

२००६मध्ये श्रीलंकेत दक्षिण आफ्रिकेने ०-२ अशी हार पत्करली होती. त्यानंतर नऊ वर्षे परदेशातील १५ कसोटी मालिकांमध्ये ते अपराजित राहिले. मात्र शुक्रवारी भारताने त्यांचा हा लौकिक मोडीत काढला.

रविचंद्रन अश्विन हा जागतिक दर्जाचा फिरकी गोलंदाज आहे. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लागोपाठच्या कसोटी मालिकांच्या विजयाचे श्रेय अश्विनला जाते. भारतासाठी तो सातत्यपूर्ण कामगिरी बजावत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये संयम हा अतिशय महत्त्वाचा असतो. अमित मिश्रानेही अप्रतिम गोलंदाजी केली. या मालिकेत फिरकीचेच वर्चस्व दिसून येत आहे.
– विराट कोहली, भारताचा कर्णधार

खेळपट्टीने शुक्रवारी अतिशय छान साथ दिली. फॅफ डू प्लेसिस आणि हशिम अमला यांनी मात्र धीराने फलंदाजी केली. एक संघ झगडत असताना, एक संघ मात्र विजयासाठी प्रयत्नशील होता. फलंदाज जसा शतकासाठी आसुसलेला असतो, तशी मला पाच बळी घेण्याची उत्सुकता असते. अमितने उपाहारानंतर अप्रतिम गोलंदाजी केली.
– आर. अश्विन, भारताचा फिरकीपटू

माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीतील मी अनुभवलेली ही कदाचीत सर्वात आव्हानात्मक परिस्थिती असेल. खेळपट्टीसुद्धा तितकीच आव्हानात्मक असल्यामुळे क्रिकेट खेळणेसुद्धा अवघड होते. भारताच्या अप्रतिम गोलंदाजीला या यशाचे श्रेय जाते. आमची गोलंदाजी चांगली झाली असती तर भारताला पहिल्या डावात २१५ आणि दुसऱ्या डावात १७३ धावासुद्धा करणे कठीण झाले असते.
-हशिम अमला, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 3:32 am

Web Title: india beat south africa
टॅग : India Vs South Africa
Next Stories
1 महाराष्ट्राला दुहेरी मुकूट
2 बॅडमिंटन : सिंधू उपांत्य फेरीत
3 राजकारणामुळेच पाकिस्तानातील शरीरसौष्ठवाचा खेळखंडोबा!
Just Now!
X