आमच्याशी जो टक्कर घेईल त्याची माती केल्याशिवाय राहणार नाही, हे भारतीय संघाने लंकादहन करत दाखवून दिले. सामन्यापूर्वी भारताला पराभूत करायला सज्ज आहोत, अशी गर्जना करणाऱ्या महेला जयवर्धनेसह श्रीलंकेच्या संघाचा ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंग धोनीच्या सेनेने आपल्या खास संयत शैलीत समाचार घेत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. गोलंदाजी असो किंवा फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करत भारतीय संघाने श्रीलंकेची ‘पळता भूई थोडी’ केली. इशांत शर्मा आणि आर. अश्विनच्या बळींच्या षटकाराच्या जोरावर भारताने श्रीलंकेला १८१ धावांमध्ये गुंडाळले, तर हे आव्हान सलामीवीर शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आठ विकेट्स आणि तब्बल १५ षटके राखून पूर्ण केले. अंतिम फेरीत भारताचा मुकाबला यजमान इंग्लंडशी रविवारी होणार आहे.
श्रीलंकेच्या १८२ धावांचा पाठलाग करताना शिखर धवन आणि रोहित शर्मा (३३) या सलामीवीरांनी पुन्हा एकदा अर्धशतकी सलामी दिली. संयमी फलंदाजी करणाऱ्या रोहितने अचानक आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याबदल्यात त्याला आपला बळी गमवावा लागला. धावांची टांकसाळ उघडणारा धवन मात्र काही केल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांची पाठ सोडत नव्हता, ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर त्याने ६८ धावांची अफलातून खेळी साकारत संघाला विजयाच्या उंबरठय़ावर उभे केले. तो बाद झाल्यावर विराट कोहलीने ही जबाबदारी खांद्यावर घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. षटकार ठोकून अर्धशतक झळकावलेल्या कोहलीने ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ५८ धावांची खेळी साकारली.
तत्पूर्वी, भारताने कुदं आणि थंड वातावरणामध्ये नाणेफेक जिंकत श्रीलंकेला फलंदाजीला पाचारण करण्याचा निर्णय घेतला आणि भारताच्या मध्यमगती तोफखान्याने तो योग्य असल्याचे दाखवून दिले. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्या हफ्त्याने श्रीलंकेच्या फलंदाजांची झोप उडवली. आपल्या दुसऱ्याच षटकात भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेला पहिला धक्का दिला. तिलकरत्ने दिलशानने आक्रमक पवित्रा घेतला. पण १२ धावांवर असताना उजव्या पायाचा स्नायू दुखावल्याने त्याला मैदानाबाहेर जावे लागले. दिलशान मैदानाबाहेर गेल्यावर श्रीलंकेने कुमार संगकारा (१७) आणि लाहिरू थिरिमाने (७) हे दोन्ही बिनीचे फलंदाज स्वस्तात गमावले आणि त्यांनी ३ बाद ४१ अशी अवस्था झाली. पण या वेळी कर्णधार अँजेलो मॅथ्यूज आणि महेला जयवर्धने (३८) संघासाठी धावून आले. संयमी फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी या दोघांनी ७८ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ते दोघेही भारतासाठी डोकेदुखी ठरत होते. पण रवींद्र जडेजाने जयवर्धनेच्या त्रिफळाचा वेध घेत भारताच्या डोकेदुखीवर चोख उपचार केले. त्यानंतरही एका बाजूने अँजेलो धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी चोख बजावत होता. मॅथ्यूजने अर्धशतक साजरे केले खरे, पण त्यानंतर त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. अर्धशतक पूर्ण झाल्यावर ५० धावांवर असताना ४६व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अश्विनच्या गोलंदाजीवर त्याचा सोपा झेल विराट कोहलीने सोडला, पण याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर अश्विनच्या ‘कॅरम बॉल’वर तो फसला आणि तंबूत परतला. अँजेलोने एक चौकार आणि एक षटकाराच्या जोरावर ५१ धावांची खेळी साकारली. अखेरच्या षटकामध्ये श्रीलंकेच्या फलंदाजांनी मोठे फटके मारण्याचे प्रयत्न केले. जखमी निवृत्त झालेला दिलशानही (नाबाद १८) फलंदाजीला आला, पण श्रीलंकेला दोनशे धावांची वेस ओलांडता आली नाही.
धावफलक
श्रीलंका : कुशल परेरा झे. रैना गो. कुमार ४, तिलकरत्ने दिलशान नाबाद १८, कुमार संगकारा झे. रैना गो. इशांत शर्मा १७, लहिरू थिरीमाने झे. रैना गो. इशांत शर्मा ७, महेला जयवर्धने त्रि. गो. जडेजा ३८, अँजेलो मॅथ्यूज झे. कुमार गो. अश्विन ५१, जीवन मेंडिस यष्टिचीत धोनी गो. अश्विन २५, थिसारा परेरा झे. धवन गो. इशांत शर्मा ०, न्यूवान कुलसेकरा त्रि. गो. अश्विन १, लसिथ मलिंगा नाबाद ७, अवांतर (लेग बाइज २, वाइड ११) १३, एकूण ५० षटकांत ८ बाद १८१.
बाद क्रम : १-६, १-१७* (दिलशान जखमी निवृत्त), २-३६, ३-४१, ४-११९, ५-१८, ६-१६०, ७-१६४, ८-१७१.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ९-२-१८-१, उमेश यादव ८-२-३०-०, इशांत शर्मा ९-१-३३-३, रवींद्र जडेजा १०-१-३-१, महेंद्रसिंग धोनी ४-०-१७-०, आर. अश्विन १०-१-४८-३.
भारत : रोहित शर्मा त्रि. गो. मॅथ्यूज ३३, शिखर धवन यष्टीचीत संगकारा गो. जीवन मेंडिस ६८, विराट कोहली नाबाद ५८, सुरेश रैना नाबाद ७, अवांतर (बाइज १, लेग बाइज ५, वाइड १०) १६, एकूण ३५ षटकांत २ बाद १८२.
बाद क्रम : १-७७, २-६८, ३-
गोलंदाजी : नुवान कुलसेकरा १०-०-४५-०, लसिथ मलिंगा ८-०-५४-०, थिसारा परेरा ६-०-२५-०, अँजेलो मॅथ्यूज ४-०-१०-१, रंगना हेराथ ४-०-१४-०, जीवन मेंडिस ३-०-२८-१.
सामनावीर : इशांत शर्मा.