भुवनेश्वर कुमारच्या अप्रतिम ‘स्विंग’ गोलंदाजीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला डकवर्थ-लुईस नियमांनुसार ८१ धावांनी मात करीत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे श्रीलंकेला २६ षटकांत १७८ धावांचे आव्हान देण्यात आले होते.
सामनावीर भुवनेश्वरने अवघ्या ८ धावांमध्ये ४ विकेट्स मिळवत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आणि श्रीलंकेच्या फलंदाजांची ‘पळता भुई थोडी’ केली होती. सुरुवातीला भुवनेश्वरच्या हादऱ्यांपुढे श्रीलंकेचा संघ हतबल झाला आणि त्यांचा डाव ९६ धावांतच आटोपला.
२२ वर्षीय भुवनेश्वरच्या भेदक ‘स्विंग’ माऱ्याचा श्रीलंकेच्या फलंदाजांना समर्थपणे सामना करता आलाच नाही. श्रीलंकेला तिहेरी धक्के देत त्यांची ३ बाद ३१ अशी दयनीय अवस्था त्याने केली आणि त्यानंतर श्रीलंकेचा संघ सावरू शकलाच नाही.
भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्माच्या नाबाद ४८ खेळीच्या जोरावर २९ षटकांत ३ बाद ११९ धावा केला होत्या. त्यानंतर पावसाच्या व्यत्ययाने खेळ थांबवण्यात आला आणि श्रीलंकेपुढे डकवर्थ-लुईस नियमांनुसार २६ षटकांत १७८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.