राणी रामपालची हॅट्ट्रिक; थायलंडवर ५-० अशी मात

कर्णधार राणी रामपाल हिने केलेल्या हॅट्ट्रिकसह भारताने थायलंडला ५-० असे पराभूत केले व महिला हॉकीतील साखळी गटात अग्रस्थान कायम ठेवीत उपान्त्य फेरीवर शिक्कामोर्तब केले.

कझाकिस्तानची २१-० अशी धूळधाण उडविणाऱ्या भारतीय खेळाडूंना थायलंडसारख्या कमकुवत संघाने कौतुकास्पद झुंज दिली. पहिली ३७ मिनिटे भारताला गोल नोंदविता आला नाही यावरूनच थायलंडच्या भक्कम बचावाचा प्रत्यय येतो. भारताकडून राणी हिने ३७ व्या, ४६ व्या व ५६ व्या मिनिटाला गोल केला. मोनिकाकुमारी (५२ वे मिनिट) व नवज्योत कौर (५५ वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत संघाच्या विजयास हातभार लावला. भारताने चार सामन्यांअखेर बारा गुणांची कमाई करीत अपराजित्व राखले. थायलंडची गोलरक्षक एलिसा नारुंगम हिने खूप सुरेख गोलरक्षण करीत भारताच्या अनेक चाली असफल ठरविल्या.

भारतीय खेळाडूंनी सामन्याच्या प्रारंभापासूनच जोरदार आक्रमण केले. त्यांना पेनल्टी कॉर्नरच्या संधीही मिळाल्या, मात्र कमकुवत फटके मारत भारतीय खेळाडूंनी या संधी वाया घालविल्या. पूर्वार्धात भारताला एकही गोल नोंदविता आला नाही. थायलंडच्या अ‍ॅलिसा हिच्यासह बचाव फळीतील खेळाडूंनी शर्थीची लढत दिली.

उत्तरार्धात सुरुवातीला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला तथापि त्यावर गुरजित कौर हिने मारलेला फटका एलिसा हिने शिताफीने अडविला. अखेर ३७ व्या मिनिटाला भारताच्या उदिता दत्ता हिने कल्पक चाल करीत गोलपोस्टच्या दिशेने चेंडू तटविला. एलिसा हिने परतविलेला फटका राणी हिने पुन्हा गोलात मारला व संघाचे खाते उघडले. तेथूनच खऱ्या अर्थाने भारताला सूर गवसला. शेवटच्या पंधरा मिनिटांत भारताने आणखी चार गोल करीत एकतर्फी विजय मिळविला. साखळी गटात भारताने गतविजेत्या दक्षिण कोरियाला मागे टाकून अव्वल स्थान घेतले. कोरियास नऊ गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.