पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेवर नऊ विकेट्स राखून विजय
पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावण्याचे स्वप्न साकारत के. एल. राहुलने भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेला १६८ धावाच करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राहुलच्या नाबाद शतकाच्या जोरावर झिम्बाब्वेवर नऊ विकेट्स राखून सहज विजय मिळवला.
भारताने नाणेफेक जिंकत झिम्बाब्वेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सुरुवातीपासूनच भारताच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेला धक्के द्यायला सुरुवात केली आणि त्यामधून झिम्बाब्वेचा संघ सावरू शकला नाही. झिम्बाब्वेकडून एल्टन चिगुंबुराच जास्त काळ खेळपट्टीवर राहू शकला. त्याने एका चौकाराच्या जोरावर ४१ धावा केल्या. बुमराने या वेळी भेदक गोलंदाजीचा नमुना पेश करत चिगुंबुरासह चार फलंदाजांना अवघ्या २८ धावांमध्ये तंबूत धाडले आणि झिम्बाब्वेचे कंबरडे मोडले.
या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पाचव्याच षटकात पहिला धक्का बसला. पण यानंतर राहुल आणि अंबाती रायुडू यांनी दुसऱ्या विकेटसाठी १६२ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या दोघांनी सुरुवातीला सावध फलंदाजी केली, पण स्थिरस्थावर झाल्यावर चांगलेच फटके मारले. राहुलने या वेळी सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद १०० धावांची खेळी साकारली, तर रायुडूने पाच चौकारांच्या जोरावर ६२ धावा करत राहुलला चांगली साथ दिली. संघाला विजयासाठी दोन धावा हव्या असताना राहुल ९४ धावांवर होता, त्यामुळे त्याचे शतक पूर्ण होईल की नाही याबाबत साशंकता होती. पण राहुलने षटकार लगावत संघाच्या विजयावर शतकही पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे : ४९.५ षटकांत सर्व बाद १६८ (एल्टन चिगुंबुरा ४१; जसप्रीत बुमरा ४/२८) पराभूत वि. भारत : ४२.३ षटकांत १ बाद १७३ (के. एल. राहुल नाबाद १००, अंबाती रायुडू नाबाद ६२; तेंडाई चटारा १/२०)
सामनावीर : के. एल. राहुल.