23 February 2020

News Flash

आशियाई सांघिक बॅडमिंटन स्पर्धा : भारत उपांत्य फेरीत

२०१६मध्ये झालेल्या गतस्पर्धेत भारताला इंडोनेशियाकडूनच १-३ असा पराभवाचा सामना करावा लागला होता.

| February 15, 2020 12:58 am

फिलिपिन्स : पहिले दोन्ही सामने गमावल्यानंतरही जोमाने पुनरागमन करत भारतीय पुरुष संघाने थायलंडचा ३-२ असा पराभव करून आशियाई सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारली. या विजयामुळे भारतीय संघाचे किमान कांस्यपदक निश्चित झाले आहे.

एकेरीच्या पहिल्या दोन्ही सामन्यात किदम्बी श्रीकांत आणि बी. साईप्रणित यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र भारताने पुढील तिन्ही सामने जिंकत विजयश्री मिळवला. आता भारताला उपांत्य फेरीत दोन वेळच्या गतविजेत्या इंडोनेशियाचा सामना करावा लागेल. २०१६मध्ये झालेल्या गतस्पर्धेत भारताला इंडोनेशियाकडूनच १-३ असा पराभवाचा सामना करावा लागला होता.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या साईप्रणितला जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या कॅन्टाफोन वँगचारोएन याच्याकडून १४-२१, २१-१४, १२-२१ अशी हार पत्करावी लागली. दुसऱ्या एकेरीत गतजागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या श्रीकांतला कुनलावूट विटीसार्न याने २०-२२, १४-२१ असे हरवले. त्यामुळे भारतीय संघ ०-२ असा पिछाडीवर पडला होता.

दुहेरीच्या तिसऱ्या सामन्यात एमआर अर्जुन आणि ध्रूव कपिला यांनी किट्टिनूपाँग केडरेन आणि तानूपट विरीयांगकुरा यांच्यावर २१-१८, २२-२० अशी सरशी साधत भारताचे आव्हान कायम ठेवले. त्यानंतर युवा लक्ष्य सेन याने जागतिक क्रमवारीत ४५व्या क्रमांकावर असलेल्या सुप्पान्यू अविहिंगसानोन याच्यावर २१-१९, २१-१८ अशी मात करत भारताला २-२ अशी बरोबरी साधून दिली. निर्णायक सामन्यात, श्रीकांत आणि चिराग शेट्टी यांनी मनीपाँग जोंगजित आणि निपिटफोन फुआंगफुआपेट यांच्यावर २१-१५, १६-२१, २१-१५ असा विजय मिळवत भारताला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला.

First Published on February 15, 2020 12:58 am

Web Title: india beats thailand to reach badminton asia team championships semis zws 70
Next Stories
1 रणजी करंडक  क्रिकेट स्पर्धा :  महाराष्ट्रावर पराभवाचे सावट
2 आशियाई युवा वेटलिफ्टिंग स्पर्धा : मुकुंद आहेरला सुवर्ण
3 राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : रत्नागिरीचे पुन्हा मुंबईवर वर्चस्व
Just Now!
X