आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या(आयसीसी) कसोटी क्रमवारीत भारतीय संघाने अव्वल स्थानी झेप घेतली आहे. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत ३-० अशी धूळ चारल्याने भारतीय संघाला क्रमवारीत पहिले स्थान प्राप्त झाले आहे, तर ऑस्ट्रेलियाच्या क्रमवारीत घसरण होऊन ते तिसऱया स्थानावर गेले आहेत.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघ ११२ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान १११ गुणांसह दुसऱया व ऑस्ट्रेलिया १०८ गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. पण भारताला आपले कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखायचे असेल तर पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळविल्याजाणाऱया वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला विजय प्राप्त करणे अपरिहार्य आहे. नाहीतर पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करण्याचा इतिहास घडवू शकतो.