५२ व्या ISSF World Championship स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी धडाकेबाज सुरुवात केली आहे. ज्युनिअर खेळाडूंच्या गटात भारताने २ सुवर्णपदकांची कमाई केली आहे. ५० मी. पिस्तुल प्रकारात भारताच्या अर्जुनसिंह चिमाने सुवर्णपदकाची कमाई केली, याचसोबत सांघिक प्रकारातही अर्जुनने आपले सहकारी गौरव राणा आणि अनमोल जैन यांच्यासोबत सुवर्णपदक पटकावलं. भारताच्या सिनीअर खेळाडूंना मात्र अंतिम फेरी गाठता आली नाही. गौरवने वैय्यक्तिक प्रकारातही कांस्यपदक आपल्या नावे केलं.

२०२० मध्ये टोकियात होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी या स्पर्धेतून खेळाडूंना प्रवेश मिळणार आहे, त्यामुळे या स्पर्धेत भारतीय खेळाडू कसे खेळ करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. दुसरीकडे १० मी. एअर रायफल मिश्र प्रकारात भारताच्या अपुर्वी चंदेला आणि रवी कुमार जोडीने पात्रता फेरीत सातवं स्थान पटकावलं. ०.४ गुणांच्या फरकाने भारतीय जोडीला अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं नाही. याचसोबत दिपक कुमार-मेहुली घोष, हिना सिद्धु-शाहझार रिझवी, मनू भाकेर-अभिषेक वर्मा जोडीलाही अपयशाचा सामना करावा लागला.