ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची अग्नीपरीक्षा सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. १७ डिसेंबरपासून अॅडलेडच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिवस-रात्र कसोटी सामन्याने कसोटी मालिकेला सुरुवात होईल. रोहित शर्मा दुखापतीमधून सावरला असल्यामुळे भारतीय संघाला एक चांगली बातमी मिळाली आहे. परंतू इशांत शर्मा यंदा कसोटी मालिकेत खेळू शकणार नसल्यामुळे इतर भारतीय गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असणार आहे. अनेक माजी खेळाडूंनीही भारताला इशांतची उणीव भासेल असं मत व्यक्त केलंय. परंतू भारतीय संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेच्या मते इशांत शर्माच्या अनुपस्थितीतही भारतीय गोलंदाज २० बळी घेऊ शकतात.

“माझ्या मते भारतीय संघात खूप चांगले आणि आश्वासक जलदगती गोलंदाज आहेत, पण इशांतची उणीव आम्हाला भासेल यात काही वाद नाही. तो संघातला सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहसोबत उमेश यादव, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज असे नावाजलेले गोलंदाज संघात आहेत. ऑस्ट्रेलियामधील वातावरणात कशी गोलंदाजी करायची याची त्यांना जाणीव आहे. गुलाबी चेंडूवरचा हा आमचा देशाबाहेरचा पहिला सामना आहे, त्यामुळे चांगली सुरुवात करणं हे गरजेचं आहे. माझ्या मते आमचे गोलंदाज इशांतशिवाय २० बळी घेऊ शकतात.” पहिल्या कसोटी सामन्याआधी झालेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत रहाणे बोलत होता.

युएईत आयपीएलचा तेरावा हंगाम खेळत असताना इशांतला दुखापत झाली होती. यानंतर तो बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपला फिटनेस वाढवण्याकडे लक्ष देत होता. परंतू कसोटी मालिकेत खेळण्यासाठी योग्य वेळेत फिट न झाल्यामुळे त्याला संघातलं आपलं स्थान गमवावं लागलं. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळून भारतात परतणार आहे, त्यामुळे उर्वरित ३ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाचं नेतृत्व हे अजिंक्य रहाणेकडे येणार आहे.