नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दमदार कामगिरी केली. बॉक्सिंग डे च्या दिवशी कसोटी पदार्पण करणाऱ्या हैदराबादच्या या युवा गोलंदाजाने या मालिकेत भारताकडून सर्वाधिक १३ विकेट घेतल्या.

या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निमित्ताने भारताला एक चांगला दर्जेदार गोलंदाज मिळाल्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटले आहे. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांच्या मते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी सिराजकडे अँगर आणि हंगर म्हणजे संताप आणि भूक या दोन्ही गोष्टी आहेत आणि त्याच त्याच्या जमेच्या बाजू आहेत.

आणखी वाचा- नॅथन लायनने शेअर केला टीम इंडियाने दिलेल्या जर्सीचा फोटो, अजिंक्य रहाणेचं केलं विशेष कौतुक, म्हणाला…

फिरकी गोलंदाज रविचंद्र अश्विनच्या यूट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात भारत अरुण यांनी मोहम्मद सिराजमधली गुणवत्ता कशी हेरली? त्या बद्दल सांगितले. “सिराजकडे हंगर आणि अँगर दोन्ही आहे. मी आरसीबीला मार्गदर्शन करत असताना, सिराज नेट बॉलर म्हणून यायचा. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध आमचा सामना होता. त्यावेळी मी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे जाऊन त्याला सांगितल की, हा मुलगा खूप चांगली गोलंदाजी करतोय. हैदराबादसाठी हा खेळत नसेल, तर तुम्ही याला संधी देऊ शकता. लक्ष्मणने सकारात्कम प्रतिसाद दिला पण त्यावर्षी सिराज फार खेळला नाही” असे अरुण यांनी सांगितले.

आणखी वाचा- IPL 2021 भारतात की भारताबाहेर? BCCI ने दिलं उत्तर

“मी जेव्हा हैदराबादचा कोच बनलो, तेव्हा सिराजला पुन्हा बोलावले. त्यावेळी संभाव्य खेळाडूंमध्येही तो नव्हता. जेव्हा मी त्याला पुन्हा गोलंदाजी करताना पाहिले, तेव्हा मी अधिक प्रभावित झालो. नेटमध्ये त्याच्या गोलंदाजीत मला धार आणि आक्रमकता दोन्ही जाणवली. हैदराबादचा कोच असताना, त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. त्यावेळी हा मुलगा हैदराबादकडून खेळला पाहिजे, असे मी त्यांना ठामपणे सांगितले” असे भारत अरुण म्हणाले.

आणखी वाचा- IND vs AUS: विजयी फटका मारण्याआधी ऋषभ पंत काय म्हणाला होता? सैनीने सांगितला ‘तो’ किस्सा

“आत्मविश्वास हे सिराजचं सर्वात मोठ शक्तीस्थळ असून त्याचीच त्याला संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मदत झाली” असे भारत अरुण म्हणाले. सिराजचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे “जर आम्ही सिराजला काही करायला सांगितलं, तर मैदानावर तो त्याची जशीच्या तशी अमलबजावणी करतो” असे भारत अरुण म्हणाले.